पिंपरी चिंचवडच्या रोसलँड सोसायटीला `स्वच्छतेचा` पुरस्कार!
पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर भागातली रॉसलँड सोसायटी सध्या चर्चेत आहे. सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे.
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर भागातली रॉसलँड सोसायटी सध्या चर्चेत आहे. सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवडच्या रोसलँड सोसायटीला पुरस्कार दिलाय. तब्बल ९८२ फ्लॅट्स आणि साडे चार हजारांहून अधिक लोकसंख्या या वसाहतीची आहे. २०१० पासून वासहतीतले रहिवाशी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवतात. त्यातील ओल्या कचऱ्यावर वसाहतीतच सेंद्रीय खत बनवलं जातं. त्यासाठी विशेष यंत्रणा वसाहतीत लावण्यात आलीय. असंख्य झाडांनी वेढलेल्या या वसाहतीतील झाडांनाच ते खत टाकले जातं. ओला कचराच नाही तर 'ई' कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही वसाहतीत विशेष सोय करण्यात आली. ई-कचरा प्रक्रिया करणाऱ्या एजन्सीला दिला जातो.
पिंपळे सौदागर हा तसा उच्चभ्रू भाग... जवळपास ८० टक्के नागरिक आयटी इंडस्ट्रीत काम करणारे... त्यामुळे साहजिकच प्रकल्प राबवण्यासाठी आर्थिक सुबत्ताही आहे. मात्र केवळ आर्थिक सुबत्ता आहे म्हणून नाही, तर स्वच्छतेसाठी धोरण राबवण्याची दृष्टी इथे शिकल्या सवरल्या नागरिकांमध्ये आहे. त्यातूनच हे उत्तम पाऊल त्यांनी उचललं.
आपल्यासाठी काही प्रश्न...
तुमच्या सोसायटीत तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा करता का?
तुमच्या सोसायटीत ई वेस्टचं तुम्ही काय करता?
तुमच्या सोसायटीत कचऱ्याचं विघटन करण्यासाठी काय सोय केली आहे?
तुमच्या सोसायटीत सोलर पॅनेल आहेत का?
तुमच्या सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टींग आहे का?
तुमच्या सोसायटीत राष्ट्रीय सण साजरे होतात का?
तुमच्या सोसायटीत तंटामुक्तीसाठी काय उपक्रम आहेत?
असे अनेक प्रश्न विविध गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. रोसलँडसारख्या सोसायट्या नेमका हाच आदर्श निर्माण करतात.