Mohan Bhagwat On Reservation: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी जोपर्यंत समाजामध्ये भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवलं पाहिजे असं म्हटलं आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना भागवत यांनी समाजामधील भेदभाव हा अदृश्य स्वरुपामध्ये अस्तित्वात असल्याचं म्हटलं आहे.


आरएसएसचा पूर्णपणे पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमधील "आपण आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना सामाजिक व्यवस्थेमध्ये मागे ठेवलं आहे. आपण त्यांची चिंता केली नाही. हे मागील 2 हजार वर्षांपासून सुरु आहे. जोपर्यंत आपण त्यांना समानतेनं संधी देऊ शकत नाही तोपर्यंत काही विशेष उपाययोजना त्यांच्यासाठी केल्या पाहिजे. आरक्षण ही अशीच एक उपाययोजना आहे. त्यामुळेच अशाप्रकारचा भेदभाव होत राहणार तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधानाने दिलेल्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे," असं भागवत यांनी सांगितलं.


तोपर्यंत अडचणी सहन केल्या पाहिजेत


सरसंघचालकांनी पुढे बोलताना, हे सारं काही (आरक्षण) सन्मान देण्यासंदर्भातील असून केवळ आर्थिक किंवा राजकीय समानतेबद्दल नाही. "समाजातील ज्या घटकांना भेदभावाचा सामना करावा लागला ते 2 हजार वर्षांपासून पीडित आहेत. तर आपण (ज्यांना असा भेदभाव सहन करावा लागला नाही त्यांनी) पुढील 200 वर्षांपर्यंत थोड्या अडचणी सहन करायला काय हरकत आहे," असंही मोहन भागवत म्हणाले. 


मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असतानाच विधान


मोहन भागवत यांनी केलेलं हे विधान राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं असतानाच आलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये 40 वर्षीय मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेनं मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी झालेल्या लाठी चार्जनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मनोज हे 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. आता कुणबी समाजातील प्रमाणपत्र देऊन मागील 3 पिठ्यांपर्यंत प्रमाणपत्र असलेल्यांना आरक्षणाचा लाभ दिला जाईल असं सरकारने म्हटलं आहे. दरम्यान, मोहन जरांगे यांनी उपोषण सोडावं यासाठी सरकारी स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या वतीने वाटाघाटी करण्यासाठी गिरीश महाजनांबरोबरच अन्य नेतेही रोज मनोज जरांगेची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत आहेत. 


लाठी चार्ज अन् वाद


1 सप्टेंबर रोजी जालन्यातील अंतरवाली सरती गावामध्ये सुरु असलेल्या या उपोषण स्थळी पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर मागील 5 दिवसांमध्ये राज्यभरामध्ये मराठा संघटनांनी या लाठी चार्जचा निषेध करुन तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. या लाठी चार्जदरम्यान आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामध्ये 40 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या 15 बस गाड्या पेटवून देण्यात आल्या.