प्रदूषण मूक्त पंचगंगेसाठी रुकडी ग्रामस्थाचे आंदोलन
कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून, त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य नाहीच तर शेतीसाठी सुद्धा योग्य नसल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय.
कोल्हापूर: रुकडी गावातील नागरिकांनी नदीत उतरून अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. नदी पत्रातील केंदाळ गळ्यात घालून नागरिकांनी हे आंदोलन केलं. तसंच यावेळी शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजीही केली. पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणही करण्यात आलं. जोपर्यंत नदी स्वच्छ होत नाही तोपर्यंत साखळी उपोषणाद्वारे लढा कायम ठेवण्याचा निर्धारआंदोलकांनी व्यक्त केलाय.
पंचगंगेचे पाणी शेतीसाठीही दूषित
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून, त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य नाहीच तर शेतीसाठी सुद्धा योग्य नसल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. या दूषित पाण्यामुळं शिरोळ तालुक्यात पिकणारा भाजीपाला खाल्ल्यामुळं कॅन्सरसारखे आजार उद्धभवणार असल्याचा, उल्लेखही या प्राथमिक अहवालात नोंद करण्यात आला आहे. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी रायचूर विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्फत शिरोळ तालुक्याचा अहवाल तयार केला आहे.
चाचणीत धक्कादायक निष्कर्ष
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना भाजीपाला पुरवणारे केंद्र म्हणून ओळखला जातो. मात्र हाच तालुका या भाजीपाल्या मार्फत रोगराई पसरवणारे आगार होतय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रायचूर विद्यापीठातील तज्ञाच्या सहकार्याने गेल्या दोन महिन्या पासून शिरोळ तालुक्यातील पाणी, माती आणि भाजीपाला यांचे विविध ठिकाणचे नमुने घेऊन त्यांच्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आले. या चाचणीत हे पाणी पूर्णतः दूषित असून ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी अयोग्य असल्याचा प्रथमिक निष्कर्ष पुढे आला.