झी मीडिया, प्रताप नाईक, कोल्हापूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची देशातच नाहीतर जगभर ख्याती आहे. क्रिकेटचा देव म्हणूनही सचिनची तुलना केली जाते. अशातच सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर देवाचं दर्शन घेताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये सचिन तेंडुलकरने पहाटेच्या काकडा आरतीच्या वेळी उपस्थिती लावली. सचिनसह मंदिरात त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही होता. मंदिरातील पूजारी आणि इतरांना सचिनच्या येण्याची कोणतीही माहिती नव्हती त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. 


सचिन तेंडुलकर हा कोल्हापुरात काल रात्री आला होता पण आज पहाटे 4:45 वाजता सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी अचानक नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले. कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या श्री दत्त महाराजाचे दर्शन घेतलं. नवल खोंबारे यांनी सचिनला श्रीफळ प्रसाद दिला. 



पहाटेची वेळ होती तरी देखील सचिन तेंडुलकरने रांगेतून दर्शन घेतलं. सचिन तेंडुलकरसोबत मुलगा अर्जुन होता. अर्जुनला दत्त महाराज यांचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच सचिन दत्तमहाराज चरणी दाखल झाल्याची चर्चा होताना दिसत आहेत.


सचिन तेंडुलकर नृसिंहवाडी येऊन गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नेहमी मंदिर परिसरात असणाऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली पण तोपर्यंत सचिन दर्शन घेऊन निघून गेला होता. सचिन तेंडुलकरने दत्त महाराजांचा दर्शन घेतलेला व्हिडीओ देखील वाऱ्यासारखा राज्यभर पसरला आहे.