मुंबई : मनसुख हिरेन प्रकणात अडचणीत आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Waze) यांनी ठाणे सत्र न्यायालयात ( Thane Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर १९ मार्चला सुनावणी होणार आहे. सचिन वाझे सध्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे वादात अडकले आहेत. दरम्यान, वाझे यांची सरकारने क्राईम ब्रँचमधून बदली केली आहे. (Sachin Waze's application for pre-arrest bail in Thane Sessions Court)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे एटीएसने आत्तापर्यंत वाझे यांची चार वेळा चौकशी केली आहे. तर संशयित कारच्या प्रकरणी तपास करणारी एनआयए पुढील काही दिवसांत वाझे यांची चौकसी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून ठेवला आहे. दरम्यान, काल तब्बल नऊ तास मनसुख हिरेनच्या भावाची आणि मुलाची ठाणे एटीएसने चौकशी केली आहे. 


मनसुख हिरेन यांच्या आर्थिक व्यवहारा विषयी हिरेन यांचा भाऊ व मुलगा यांची चौकशी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याआधी परवा हिरेनची पत्नी आणि मुलाची सात तास एटीएसने चौकशी केली होती. मनसूखचा मृतदेह वाहून नेणाऱ्या रूग्णवाहिका चालकासह प्रत्यक्षदर्शींचाही जबाब नोंदवण्यात आला. मृतदेह काढला तेव्हा मास्कमध्ये चार ते पाच रूमाल आढळले होते. याबाबत जबाब नोंदवण्यात आला. 


मुंबई क्राईम ब्रांचचे सचिन वाझे यांच्यावर हिरेन प्रकरणी आरोप करण्यात आले. हिरेन यांची हत्‍या झाल्‍याचा आरोप त्‍यांच्‍या पत्‍नी विमला हिरेन  यांनी केला होता. यानंतर वाझे संशयाचा भोवर्‍यात सापडले. हिरेन यांच्‍या मृत्यूचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्‍याचे सरकारने जाहीर केले.