नितेश महाजन, झी मीडिया, जालना : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा (Dairy Farmer) प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशी दारूच्या 180 मिलीच्या एका चपटीची किंमत 90 रुपये आहे.आणि 1 हजार मिली दुधाची किंमत 30 रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्याला देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.आज सदाभाऊ खोत हे जालन्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. राज्यात ज्याला साखर कारखाना (Sugar Factory) काढायचा आहे त्याला काढू द्या, त्यासाठी दोन कारखान्यातील हवाई अंतराची अट काढून टाका. हवाई अंतराची अट म्हणजे साखर कारखानदाराला 25 किलोमीटर परीसरात लुटण्याचं लायसन्स असल्याची टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 जूनला दुधाच्या प्रश्नावर पुण्यात दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने हे लुटारुंच्या टोळ्या आहेत. म्हणून 25 किमीच्या हवाई अंतराची अट काढून टाका अशी मागणी आपण केल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. तसंच तुकडेबंदी कायदा रद्द करा, एक गुंठा, दोन गुंठा जमीन शेतकऱ्याला विकायची असेल तर त्याला विकता आली पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन सरकारबरोबर चर्चा केली आहे अशी माहितीही सदाभाऊंनी दिलीय. 


दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा
शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जात होता. पण आता कित्येक शेतकऱ्यांचा तो मुख्य व्यवसाय झाला आहे. दुधाचा व्यवसाय हा ग्रामीण भागातल्या आर्थिक चलनवलनाचा कणा आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांपैकी बहुतेक जण लहान, अल्पभूधारक शेतकरी आहेत. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाचे भाव घसरल्यामुळे कोलमडून पडला असताना या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.


भाजपाला घटक पक्षांचा विसर
सरकार सत्तेत आल्यापासून भाजपला घटक पक्षाची आठवण झाली नसल्याची खंत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळं सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदाची संधी मिळणार का असा प्रश्न विचारला आहे. राज्यात सरकार आलं मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना अद्याप घटक पक्षाची आठवण झालेली नाही, की बैठक बोलवायची, की अजून नंबर आला नाही, असं खोत यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर आम्ही भाजपसोबत आहोत असं म्हणतो मात्र ते आम्ही सोबत असल्याचं म्हणत नाहीत. प्रत्येकाची एक वेळ येत असते. त्यामुळं आम्ही वाट पाहून आहोत असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.