सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका
राजू शेट्टींवर जोरदार टीका
मुंबई : कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिम्मत शेट्टींमध्ये राहिली नाही असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना लगावला आहे. साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत राजू शेट्टी यांच्यात राहिली नाही. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर जोरदार टीका केली आहे. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलीकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याचं खोत यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
उसाच्या दरासंदर्भात खोत यांना विचारले असता त्यांनी शेट्टींवरच निशाणा साधला. शेट्टी यांनी अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. थकीत ऊस बिलावरून निघालेल्या कोल्हापूरातील मोर्चात खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री दिसतील तिथे अडवण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांनाच टार्गेट करण्याचे निश्चित करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावा नाहीतर अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नसल्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला होता.
सदाभाऊ खोत यांनी शेट्टींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही. वेळ पडल्यास 'इट का जवाब पथ्थर से' देऊ असा प्रति इशारा देखील खोत यांनी शेट्टींना दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा संघर्ष आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवली तर हातकणंगले मतदार संघातूनच लढवणार असं पुन्हा एकदा खोत यांनी बोलून दाखवले आहे.