Sadabhau Khot Slams Suniel Shetty: देशाभरामध्ये टोमॅटोच्या दराची (Tomato Rates) चांगलीच चर्चा आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपये प्रती किलोचा टप्पा गाठला आहे. अशातच अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) यासंदर्भात चिंता व्यक्त करताना टोमॅटोचे दर वाढल्याचा परिमाण सेलिब्रिटींवरही होतो असं म्हणत महागाईची झळ बसत असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. याचवरुन आता शेतकरी नेते आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सुनील शेट्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने चिंता व्यक्त करणार सुनील शेट्टी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचा उल्लेख करत उपरोधिकपणे खोत यांनी सुनील शेट्टीचा उल्लेख 'जागतिक भिकारी' असा केला आहे.


"तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात..."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाभाऊ खोत यांनी टोमॅटोच्या दरावरुन कलाकारांकडून होत असलेल्या विधानांवर नाराजी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना खोत यांनी, "देशात टोमॅटोच्या दरांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सर्वच लोक आता टोमॅटोबद्दल बोलून पागल झाले आहेत. या पागल लोकांमध्ये भर पडली आहे ती सिने कलावंतांची. सिने कलावंत हे संवेदनशील असतात. सामान्य माणसांची भावना वेशीवर टांगणारी माणसं म्हणजे सिने कलावंत. मात्र काही सिने कलावंत सडक्या डोक्याचे आहेत. सुनील शेट्टी आर्थिक दृष्ट्या गब्बर सिंग आहे. तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही," असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना खोत यांनी, "अरे शेतकऱ्याची भूमिका करायची असेल तर कोट्यवधी रुपये घेता. तोच शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय त्याला कधीतरी 10-12 वर्षातून चांगला भाव मिळाला तर तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागतं," अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.


"तुम्ही जेवढा दारु गुटख्यावर पैसा खर्च करता..."


सुनील शेट्टीवर सदाभाऊ खोत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका करताना, "सुनील शेट्टी तुम्ही सिने कलावंत नाही तुम्ही बाजारु कलावंत आहात. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, माय-माऊलीला आवाहन करतो की, सुनील शेट्टी हा जागतिक भिकारी आहे. हा जर तुमच्या दाराला कटोरा घेऊन आला. वाढ गं माई असा जर त्याचा आवाज आला. तर या सडक्या डोक्याच्या माणसाच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका आणि त्याची भूक भागवा. कारण हा संताप माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याच्या मनात निर्माण होत आहे. या सिने कलावंतांना मी सांगतो, अरे तुम्ही जेवढा दारु गुटख्यावर पैसा खर्च करता, सिगारेट ओढायला तुम्ही जेवढा पैसा खर्च करता त्यातील काही भाग टोमॅटो शेतकऱ्यांच्या घरात आला तर त्यांच्या लेकराबाळांचं भविष्य उज्वल होईल, याचा कधीतरी तुम्ही विचार करणार आहात की नाही?" असा प्रश्न विचारला आहे. 


 


नक्की वाचा > सुनील शेट्टीकडून लेकीला प्रेमळ संसारिक सल्ला; मात्र जावयाला दिली WARNING


 


ट्वीटरवरुनही केली टीका


सदाभाऊ खोत यांनी ट्वीटरवरुनही सुनील शेट्टीवर टीका केली आहे. "आजकाल मी टोमॅटो कमीच खातो. लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते - सुनील शेट्टी... जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढ गं माई," असं ट्वीट खोत यांनी केलं आहे.



सुनील शेट्टी नेमकं काय म्हणाला होता?


"आम्ही ताज्या भाज्या खाण्यास प्राधान्य देतो म्हणूनच माझी पत्नी केवळ 2 ते 3 दिवसांच्या भाज्या एकावेळेस घरी आणते. मात्र सध्या टोमॅटोचे दर वाढले आहेत. टोमॅटो दरवाढीचा परिणाम आमच्या घरातील किचनवरही झाला आहे. मी हल्ली कमी टोमॅटो खातो. लोकांना वाटू शकतं की सुपरस्टार असल्याने याला महागाईचा काय फरक पडतो. मात्र असं काहीही नाही. आम्हालाही या सर्व गोष्टींचा फटका बसतो," असं सुनील शेट्टीने 'आजतक'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.