ड्रोनमधून आता माणसंही उडणार, एकदा व्हीडिओ पहाच
तब्बल 130 किलो वजन उचलण्याची या ड्रोनची क्षमता आहे. सुमारे 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास या ड्रोनमधून करता येईल.
हेमंत चापुडे, झी मीडिया, चाकण : व्हीडिओ शुटिंग असो, नाहीतर शेतातली फवारणीची कामं. सध्या ड्रोनचा (Drone) वापर विविध कारणांसाठी होतोय. पण लवकरच या ड्रोनमधून माणसांना पक्ष्यांसारखं एका जागेवरून दुस-या जागेवर उडता येणाराय. हे कसं शक्य आहे? तुम्हीच पाहा. (sagar defence engineering chakan make drones)
हे आहेत झी 24 तासचे चाकण प्रतिनिधी हेमंत चापुडे. तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते आता बसल्या बसल्या हवेत उडून दाखवणार आहेत. पाहताय ना, ते कसे हवेत उडतायत. हेमंतच नाही, तर आता कुणीही माणूस अशाप्रकारे हवेत उडू शकतो. कारण चाकणच्या सागर डिफेन्स इंजिनिअरींग कंपनीनं असे खास ड्रोन तयार केलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माणसांसह उड्डाण करणाऱ्या या ड्रोनची चाचणी करण्यात आलीय. या ड्रोनमधून माणसं एका जागेवरून दुस-या जागेवर प्रवास करू शकतात. चार वर्षांच्या अथक मेहनतीतून हा ड्रोन साकारलाय.
ड्रोनमधून उडणार माणूस
तब्बल 130 किलो वजन उचलण्याची या ड्रोनची क्षमता आहे. सुमारे 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास या ड्रोनमधून करता येईल. ड्रोनचा वापर एअर टॅक्सी, अॅम्ब्युलन्स किंवा जड साहित्याच्या वाहतुकीसाठी होऊ शकतो. ड्रोन बनवताना सुरक्षेची खास खबरदारी घेण्यात आलीय. ड्रोनमध्ये प्रत्येकी 16 फॅन आणि बॅटरीज आहेत. तर 4 स्वयंचलित संगणक आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यास ड्रोनमध्ये पॅराशूटची व्यवस्था आहे. लवकरच भारतीय सैन्यदलात हा ड्रोन दाखल होणाराय.
सध्या व्हीडिओ शुटिंगसाठी ड्रोनचा सर्रास वापर होतो. शेतात फवारणीसाठीही ड्रोन वापरले जातात. पण आता ड्रोनच्या माध्यमातून माणसांचं उड्डाण हा नवा क्रांतीकारी बदल असणाराय आणि मराठी तरुणांनी तंत्रज्ञानातला हा चमत्कार साकारलाय, हे विशेष.