विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : संभाजीनगरच्या (sambhaji nagar) पैठण तालुक्यतील चित्तेगावमध्ये एका रुग्णालयात डॉक्टर पती-पत्नीकडून विवाहित महिलेचा गर्भपात (Abortion) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भपातानंतर या महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस (sambhaji nagar police) आणि आरोग्य विभागाने  रुग्णालयावर छापा टाकला आहे. छाप्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभर गाजलेल्या बीडच्या परळी तालुक्यातील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणाची संभाजीनगरमध्ये पुनरावृत्ती झाल्याने खळबळ उडाली आहे. 2012 साली डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी अनेकदा गर्भपात केले होते. मुंड दाम्पत्याने केलेल्या गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. या गंभीर प्रकरणावरुन न्यायालयाने प्रशासनावर ताशेरे आढेरे ओढले होते. मात्र आता पुन्हा असाच प्रकार संभाजीनगरमध्ये झाल्याचे समोर आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल जाधव आणि सविता जाधव अस या डॉक्टर दाम्पत्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. हे दाम्पत्य औरंगाबाद स्त्री रुग्णालय या नावाने बिडकीन हद्दीतील चित्तगाव येथे रुग्णालय चालवत होते. दोघांकडेही कोणत्याही प्रकारची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसतानाही ते रुग्णालय चालवत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळं हे बोगस डॉक्टर नक्की किती दिवसांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळत होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


नेमकं काय झालं?


जाधव दाम्पत्याने एका 22 वर्षीय विवाहित महिलेचा गर्भपात केला होता. या महिलेला आधी दोन मुली असल्याने गर्भवती असल्याने महिलेची लिंगनिदान चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत महिलेच्या गर्भात स्त्री अर्भक असल्याचे समोर आल्यानंतर तिचा  गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गर्भपातादरम्यान जाधव दाम्पत्याकडून चूक झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. यानंतर महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने संबंधित खासगी रुग्णालयाती डॉक्टरांनी तिला घाटी शासकीय रुग्णालयात पाठवले. महिला शासकीय रुग्णालयात दाखल होताच हा सर्व प्रकार समोर आला.


रुग्णालयातील डॉक्टरांनी याची माहिती तात्काळ आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना दिली. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आरोग्य विभागाने चित्तेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयावर छापा टाकला. मात्र कारवाईची कुणकुण लागताच डॉक्टर पती-पत्नी फरार झाले. छाप्यावेळी आरोग्य पथकाला रुग्णालयात गर्भपात करणारे साहित्य सापडले. सोबतच सरकारने बंदी घातलेले अनेक औषध देखील रुग्णालयात सापडली आहेत.


पोलिसांनी काय सांगितलं?


"घाटी वैद्यकीय रुग्णालयात गर्भपातादरम्यान झालेल्या महिलेवर उपचार सुरु असून त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. बिडकीन हद्दीतील औरंगाबाद रुग्णालयात या महिलेचा गर्भपात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चितेगाव येथील औरंगाबद रुग्णालयात तपास करण्यात आला. हे रुग्णालय कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय अमोल जाधव आणि त्याची पत्नी सविता जाधव चालवत होते. दोघांकडेही कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाले नाही. या रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या महिलेचे कागदपत्रे तसेच गर्भपाताचे साहित्य आढळून आले आहे," असे बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितले.