सीमावाद पेटलेला असताना मराठमोळ्या डॉक्टराकडून माणुसकीचे दर्शन; कानडी रुग्णाला दिलं जीवनदान
Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये एका मराठमोळ्या डॉक्टरने कानडी रुग्णावर उपचार करत त्याला जीवनदान दिलं आहे. त्यामुळे निराधार बेवारस कानडी रुग्णासाठी मराठमोळा डॉक्टर देवदूत ठरला आहे
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी वाद (maharashtra karnataka border dispute) सुरु असताना संभाजीनगरमध्ये माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना घडलीय. कर्नाटकातील सीमाभागातील गावांमध्ये मराठी भाषिक नागरिकांची अनेकदा गळचेपी केली जाते. मात्र महाराष्ट्राने आपल्या मनाचा मोठेपणा कायम ठेवला आहे. संभाजीनगरमध्ये एका मराठमोळ्या डॉक्टरने कानडी रुग्णावर उपचार करत त्याला जीवनदान दिलं आहे. त्यामुळे निराधार बेवारस कानडी रुग्णासाठी मराठमोळा डॉक्टर देवदूत ठरला आहे. (sambhaji nagar Kanadi patient treated by Marathi doctor)
27 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज
27 दिवसांच्या उपचारानंतर संभाजीनगरच्या जिल्ह्या रुग्णालयातून या निराधार कानडी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर या रुग्णाचे पाय रुग्णालयातून हलत नव्हते. यासोबत त्याच्या डोळ्यातील अश्रुही थांबत नव्हते. डॉक्टरांमध्ये देवमाणूस दिसला असे म्हणत रुग्णाने सर्वांचा निरोप घेतला. कर्नाटकातील या रुग्णाला मिळालेल्या उपचाराने तो भारावून गेला आहे. सध्या दोन्ही राज्यांत सीमावाद पेटलेला असताना मराठमोळ्या डॉक्टरने कानडी रुग्णावर माणुसकीच्या निरपेक्ष भावनेतून उपचार करून त्याला बरे करत सामाजिक सौहार्दाचे वेगळे उदाहरण घालून दिले आहे.
उपचारांसह विविध चाचण्यांनतर प्रकृती ठणठणीत
नोव्हेंबर महिन्यात रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील प्रवेशद्वारासमोर एक ७० वर्षीय निराधार वृद्ध थंडीत कुडकुडत असल्याचे डॉ. बाळासाहेब शिंदे यांनी पाहिले. मळकट कपडे, वाढलेली दाढी अशा स्थितीत असल्याच्या या वृद्धाची खालावली असल्याचे डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास आले. यानंतर डॉ. बाळासाहेब शिंदे यांनी तातडीने व्हीलचेअर बोलावून त्या वृद्ध रुग्णास उपचारासाठी नेले. उपासमारीमुळे त्याला धड चालताही येत नव्हते. तसेच काही विचारल्यावर सांगताही येत नव्हते. डॉक्टरांनी तात्काळ वृद्ध रुग्णावर उपचार सुरू केले. यावेळी शिंदे यांनी विविध तपासण्या देखील केल्या. तब्बल 27 दिवस उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाली.
रामगौडा असे या रुग्णाचे नाव असल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलांनी त्यांना जवळ केलं नाही हे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह इतरांनी त्यांची काळजी घेण्यास सुरूवात केली. या काळात उपचार घेणारे इतर रुग्णही रामगौडा यांचे मित्र झाले होते. रामगौडा यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना कुठे पाठवावे हा प्रश्न सर्वांना पडला होता. डॉक्टरांनी सेवाभावी संस्थेचा शोध घेऊन रामगौडा यांना बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संत गाडगे महाराज शहरी बेघर निवारा गृहात पाठवले आहे.