प्लास्टिकच्या कुंडीची किंमत 5 हजार; अपघातामुळे समोर आला संभाजीनगर पालिकेचा अजब कारभार
Sambhaji Nagar : भ्रष्टाचाराचा हा प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मात्र जर हा अपघात झाला नसता तर हे प्रकरण समोर आले असते की नाही याची शंका निर्माण झाली आहे. दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी या प्रकरणी बोलायला तयार नाहीयेत
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : भ्रष्टाचाराची (Corruption) अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील पण संभाजीनगरात (Sambhaji nagar) घडलेल्या प्रकारामुळे तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. एखादं झाड लावण्यासाठी असलेल्या कुंडीची (Planting pot) किंमत अंदाजे ही 200 ,500 किंवा 1000 असू शकते. मात्र छत्रपती संभाजीनगर महापालिकेने (Sambhaji nagar Municipal Corporation) तब्बल 5 ते 6 हजार किमतीची प्रत्येकी एक कुंडी खरेदी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार एका अपघातातून समोर आलाय.
झालं असं की, संभाजी नगरात G20 परिषदेचे सदस्य येणार होते. त्यामुळे संभाजी नगर शहर सुंदर दिसावं याकरता सगळीकडे कुंड्यामध्ये झाडं रोपटी लावण्यात आली होती. मात्र एक अपघात झाला आणि या कुंडीची किंमत समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. सेवन हिल उड्डाणपुलावर एका भरधाव कारचे नियंत्रण सुटले आणि ही कार कुंड्याना धडकली.
या अपघातात महापालिकेने विकत घेतलेल्या आठ कुंड्यांची नासधूस झाली. यात काही कुंड्या या सिमेंटच्या तर काही प्लास्टिकचा होत्या. नुकसान झाल्याने महापालिकेने याबाबतची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तब्बल 82 हजार 984 रुपयांचे झाल्याचे सांगितले. म्हणजे एक कुंडीची किंमत सरासरी 5200 रुपये असल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे आता खरंच एक कुंडी झाड मातीसह इतकी महाग मिळते का हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या तक्रार अर्जामुळेच कुंडीची ही किंमत पुढं आली आहे. त्यामुळे G20 परिषदेच्या निमित्ताने सुशोभीकरण करण्यासाठी बेसुमार खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. शहरभर लावलेल्या या कुंड्यापैकी एकाची किंमत जर 5 हजार असेल तर महापालिकेने कोट्यावधींच्या कुंड्या खरेदी केल्या अस म्हणता येईल. त्यामुळे खरंच कुंड्या इतक्या महाग आहेत की त्यात लावलेली झाडे महाग आहेत की माती महाग आहे याचे उत्तर आता महापालिकेला द्यावे लागणार आहे. तूर्तास महापालिकेने फक्त पोलिसांना कारवाईसाठी पत्र दिले आहे. तसेच नुकसान करणाऱ्याकडून पैसे वसूल करण्यात यावे असे सांगितले आहे. मात्र याबाबत महापालिका अधिकारी अधिक बोलायला तयार नाहीत.