उपोषण मागे नाहीच, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे निर्णयावर ठाम
आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही किंवा कोणाची सुपारी घेऊन आलेलो नाही. मराठा समाजातील ७० टक्के गरीब समाजासाठी माझे हे उपोषण सुरु आहे. गरिबांना न्याय मिळावा हीच आपली भूमिका आहे. सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देऊ, तोपर्यत इथेच ठाण मांडून आम्ही बसणार आहोत.
मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते त्यांनी सांगितलं. माझे उपोषण हे स्वतःसाठी नाही तर गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आमरण उपोषणास बसलेले संभाजीराजे यांनी घेतलीय.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आझाद मैदान येथे संभाजीराजे यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या या चर्चेनंतर संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गृहमंत्री 100 टक्के लक्ष घालतो म्हणाले आहेत. ते मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. आमरण उपोषण मागे घेणार नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलंय.
गृहमंत्र्यांनी आपली तब्येत बरोबर नाही. आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. पण, त्यांना स्पष्टपणे सांगितले की वेळप्रसंगी आणखी तीन, चार दिवस मी राहू शकतो. आपण पुढाकार घेऊन मंत्रिमंडळाची युद्धपातळीवर मीटिंग घ्या आणि त्यात जे निर्णय होईल ते लेखी स्वरूपात घेऊन असे त्यांना सांगितले आहे.
आमच्या मागण्या गृहमंत्री यांच्यासमोर मांडल्या आहेत. सरकारचा निर्णय होईपर्यंत आम्ही इथंच आहोत. आमची काळजी करू नका. नाशिक, रायगड येथे आंदोलन झाले. आता मुबंईत आम्ही बसलो आहोत. गृहमंत्री यांच्या खात्यासंबंधित काही विषय आहेत. त्यावर चर्चा झाली असून राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे असे आवाहन संभाजीराजे यांनी कार्यकर्त्याना केले.
प्रश्न सुटले पाहिजेत हीच भावना - गृहमंत्री
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जावेत या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत.
जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत हीच माझी भावना आहे. परंतु, छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृतीही आपल्यादृष्टीने महत्त्वाची आहे. त्या दृष्टीकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावे असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले.