Sambhajiraje Chhatrapati on Ajit Pawar: वाल्मिक कराड अटकेवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात? अशी विचारणा त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. तसंच वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मोक्का लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. पुणे पोलिसांच्या तपासावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इतके दिवस वाल्मिक कराड पुण्यात असताना त्यांना कळलं कसं नाही अशी विचारणा त्यांनी केली आहे. 


'धनंजय मुंडे काल CM ना भेटतात अन् आज...', वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संभाजीराजेंना शंका, 'CID चं यश नव्हे तर...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अजित पवारांनी एकदाही या विषयावर भाष्य केलेलं नाही. तुम्ही फक्त जाऊन सांत्वन केलं आहे. पण तुम्ही निर्णय काय घेतला? धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात? असे प्रश्न संभाजीराजेंनी विचारले आहेत. "वाल्मिक कराड शरण झाला म्हणजे विषय संपला नाही. याउलट आता जबाबदारी वाढली आहे. त्याचा सीडीआर काढला पाहिजे. तीन दिवस तो पुण्यात राहिला आणि पोलिसांना समजलं कसं नाही? तपासातील किती मोठी त्रुटी आहे. 22 दिवसांनी त्याला शरण यावं असं सुचलं. तो शुद्धीत असता तर दुसऱ्या दिवशीच झाला असता," अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. 


'हे सीआयडीचं यश नाही'


"वाल्मिक कराड शरण आला हे सीआयडीचं यश नाही. त्याच्यावर थोडाफार मानसिक दबाव आला असेल म्हणून तो कदाचित शरण आला असेल. 22 दिवस तो हाती लागत नाही. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो. याच्या मागे काही दडलंय का? हादेखील तपासाचा भाग आहे," अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे. 


'मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा'


"वाल्मिकवर 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सात आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा नोंद करून चालणार नाही. त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यावर मुख्यमंत्री काय बोलणार आहेत हे सांगावं. खंडणीच्या गुन्ह्यामुळे उद्या जामिनावार बाहेर आला हा खेळखंडोबा आम्ही पाहणार नाही.  मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं होतं तो शब्द पाळावा. तुम्ही मोक्का, खुनाचा गुन्हा कसा लावणार याचं स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी द्यावं," अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. 


'धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे'


"धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे. त्यांना पालकमंत्री करू नये. जर धनंजय मुंडेंना पालकमंत्री दिलं तर मला जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं लागेल असं मी जाहीर सभेत बोललो होतो. त्यांना पदावरुन काढल्याशिवाय बीडमधील जनतेला, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही. बीडमध्ये हे जे संघटित गुन्हे ज्याप्रकारे सुरु आहेत ते पाहता धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरुन खेचणं आणि पालकमंत्रीपद न देणं तुम्ही भाष्य करावं," अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.