Samruddhi Highway Bus Accident : शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) आतापर्यंतच सर्वात मोठा भीषण अपघात झालाय. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) 25 प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूरहून ही बस पुण्याकडे चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ टायर फुटल्याने बस पलटली आणि डिझेलच्या टाकीने पेट घेतला. टाकी फुटताच संपूर्ण बसने काही क्षणात पेट घेतला आहे. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र आता पुन्हा एकदा अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रामुख्याने बसचा टायर फुटल्यानेच हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा झाला अपघात?


विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. 30 जूनला नागपूरहून संध्याकाळी 5 वाजता ही बस पुण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. 1 जुलैच्या रात्री 1.22 मिनिटांनी पिंपळखुटा गावाजवळ धावत्या बसचे समोरील टायर अचानक फुटल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटली. त्यानंतर ट्रॅव्हल्समधल्या डिझेट टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला. काही कळायच्या आता बस पेटल्याने अनेकांना त्यातून बाहेर पडता आले नाही. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून कोळसा झाला आहे.


या भीषण अपघातानंतर आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. बहुतेक अपघात हे या महामार्गावरुन प्रवास करताना वाहनांचे टायर फुटल्यामुळेच झाल्याचे म्हटलं जात आहे. तसेच अनेकजण वेगमर्यादा ओलांडत असल्यानेही मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी असा प्रश्न आता विचारला जात आहे.


टायर कसा फुटतो?


‘नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस कम्युनिकेशन वे’अर्थात हिंदूह़दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कमाल 120 किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. त्यामुळे प्रशस्त अशा महामार्गावरुन गाडी चालवताना अनेकजण गाडीच्या टायरमध्ये साधी हवा भरतात. टायरच्या जेव्हा हवा भरली जाते तेव्हा त्यात 78 टक्के नायट्रोजन, 21 टक्के ऑक्सिजन आणि एक टक्का इतर वायू असतो. गाडीच्या टायरमध्ये किमान 32 ते 33 बार इतकी हवा भरली जाते. मात्र बराच वेळ वाहन चालवल्यानंतर ती हवा प्रसरण पावते. त्यामुळे टायरमधील हवा 45 ते 50 बारपर्यंत पोहोचते. त्यामुळे टायर फुटण्याची शक्यता निर्माण होते. 


काय काळजी घ्यायला हवी?


उन्हाळ्यात रस्त्याचे तापमान अधिक वाढते. बराच वेळ गाडी चालवल्याने वाढलेल्या तापमानामुळे टायर फुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चालकांनी गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजनची हवा भरावी. तसेच चालकांनी लांबचा प्रवास करताना टायरची साइड वॉल चेक करायला हवी. तसेच गाडीचे अलायमेंट देखील तपासले पाहिजे. गाडी चालवताना 100 ते 150 किलोमीटर प्रवास केल्यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा.