अमर काणे, झी मीडिया, नागपूर : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या  पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पुढे ढकलण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्गावरील नागपूरकडून पंधरा किलोमीटर अंतरावर वाईल्ड लाईफ ओव्हरपासचा काही भाग कोसळून अपघात झाल्याने हा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी वन्यजीव उन्नत मार्ग म्हणजेच वाइल्डलाइफ ओवरपास बनवण्यात आले आहेत.


नागपूरकडून मुंबईकडे जाताना समृद्धी महामार्गावरील पहिल्या वाइल्ड लाईफ ओव्हरपासचा एका आर्चचा काही भाग 24 तारखेच्या पहाटेला कोसळला. यावेळी झालेल्या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाल्याचं तिथे काम करणारे इतर मजूर अगदी दबक्या आवाजात सांगतात. मात्र एमएसआरडीसीकडून याबाबत अजून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 


अपघातानंतर आता वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपरस्ट्रक्चर बनवण्याचं सुचवण्यात आलं आहे. त्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते शेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड महिने पुढे ढकलला आहे.


आधी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण दोन मे रोजी करण्याचे नियोजित होतं. त्यासाठी महा विकास आघाडी सरकारने तयारीही सुरू केली होती. नुकतंच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर ते शेलुबाजार पर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणीही केली होती. मात्र अजूनही अनेक ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे.


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग सुरू न करण्याचा सल्ला दिला होता. खरतर काम पूर्ण होण्याअगोदरच पहिल्या टप्प्याच्या उदघाटनाचा अट्टहास का होता असा सवाल आता उपस्थित केला जात होता.