समृध्दी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट, गुरुवारपासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ
Samruddhi Mahamarg वर 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी मार्गावर बससेवा, तिकिटाचे दर आणि बस सुटण्याची वेळही ठरली
Maharashtar Samruddhi Mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. त्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. आता प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळातर्फे 15 डिसेंबर म्हणजे उद्यापासू नागपूर ते शिर्डी या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना 2X1 पध्दतीची 30 आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून 15 शयन आसनं (Sleeper) आहेत.
नागपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता बस सुटेल आणि पहाटे 5.30 वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ किलोमीटर आणि वेळेमध्ये 4.15 तास बचत होणार आहे. या बससेवेसाठी 1300 रुपये तिकिट आकारण्यात येणार आहे. मुलांसाठी 670 रुपये, 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना तिकिटात 50 ट्क्के सवलत आणि 75 वर्षांवरील प्रौढांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे.
याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. ही बससेवा ही नागपूर आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10.00 वाजता सुटेल आणि जालना मार्गे पहाटे 5.30 वाजता पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 किलोमीटर आणि प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होणार आहे.
या बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु. 1100/- , मुलांसाठी रु.575/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु.945/- तर मुलांसाठी रु.505/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे
प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.