प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : अवैध रेती उत्खनन प्रकरणी शनिवारी संध्याकाळी पालघर पोलीस अधीक्षकांनी खार्डी आणि खाणीवडे रेती बंदरावर धाड टाकली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा वरदहस्त समोर आलाय. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या चौकशीचे आदेश देऊन रेतीचोरीला संरक्षण देणाऱ्या १२ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी यासंदर्भातील आदेश दिले. पालघर जिल्यातील  रेतीप्रकरणी आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने पालघर पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. 


खार्डी आणि खानिवडे रेतीबंदरावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सापळा रचण्यात आला. नियोजनरित्या मारलेल्या धाडेत ७ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. 



दररोज व जाणीवपुर्वक होणाऱ्या रेतीचोरीप्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलिस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन होत असल्याचे माहीती होती. 


तरीही तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे. तर मांडवी दूरक्षेत्रातील एक पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांची कसुरीवरून बदली केल्याने पालघर जिल्ह्यातील रेतीप्रकरणी ऐतिहासिक कारवाई असल्याचे बोलले जात आहे.


पोलीस हवालदार गौतम देवराम तोत्रे, पोलीस नाईक संतोष बाबू धांगडा, तानाजी अजिनाथ जाधव, सुभाष दादाराव शिंदे, भरत आत्माराम गोवारी, महेंद्र किसन पाटील, गजेंद्रसिंग बबनसिंग पाटील, विजय हिंदुराव गुरव, भूषण हरिश्चंद्र पाटील, पोलीस शिपाई नवनाथ दादा शेळके, गोविंद बळीराम मुसळे आणि उत्तम अमृत भोये अशी बदली करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.