Sandeep Deshpande Attack :  मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande Attack) यांच्यावर मुंबईत हल्ला झाला आहे.  या प्रकरणी मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. या हल्ला प्रकरणी ठाण्यातील चिराग नगर येथून दोन जणांना मुंबई पोलिसानी चौकशी करिता ताब्यात घेतले. ही माहिती कळताच ठाण्यातील शेकडो मनसेचे सैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट ताब्यात घेतलेल्या संशयित्यांच्या घरांवर हल्लाच चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशयित आरोपीच्या एका महिला नातेवाईकासोबत मनसे कार्यकर्त्यांचा चांगलाच वाद झाला. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आला.
 दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. अशोक खरात आणि किशन सोळंकी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यातील अशोक खरात नावाचा आरोपी हा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचं समोर आले आहे. शनिवारी सकाळी त्याला भांडुपमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. 


अशोक खरातचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. बॅनरवर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, वरूण सरदेसाईंचे फोटो होते. पोलिसांनी भांडुपमधून एकूण दोघांना अटक केलीय. आणखी दोघांचा सीसीटीव्ही माध्यमातून तपास सुरू आहे. कोरोना घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानेच आपल्यावर हल्ला झाला असा आरोप देशपांडे यांनी केलाय. तर स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी हल्ला घडवल्याचा आरोप ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांनी केला. 
दरम्यान देशपांडे यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चौहान यांनी दिली.