सांगलीत `ट्राफिक पार्क`, विद्यार्थी गिरवतायत वाहतूक नियमांचे धडे
रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची माहिती असणं आवश्यक
रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. या नियमांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी सांगली पोलिसांनी शहरात 'ट्राफिक पार्क' साकारला आहे. या पार्कला दररोज शेकडो विद्यार्थी भेट देतात आणि वाहतुकीचे धडे गिरवतात.
सांगलीतल्या पोलीस मुख्यालयाच्या बागेत ही शाळा भरली आहे. या शाळेत विद्यार्थी गणित, इतिहास-भूगोल किंवा नागरिकशास्त्राचे धडे घेत नाहीत. तर ते वाहतुकीचे नियम शिकतायेत आणि पोलीस विद्यार्थ्यांना नियम शिकवातेयत.
बहुतांश अपघात चालकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव नसल्यामुळे होतं असल्याचं अनेकदा सर्वेक्षणातून दिसून आलंय. त्यामुळे ही जाण विद्यार्थी वयात रुजली पाहिजे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सांगली पोलीस मुख्यालयामध्ये साकारण्यात आलेल्या 'ट्राफिक पार्क' मध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले जात आहेत.
सांगली पोलीस मुख्यालयातील बगीच्याचं रुपांतर 'ट्राफिक पार्क'मध्ये झालंय. विविध पुतळे आणि चित्र स्वरूपात पार्क साकारण्यात आलाय. रेल्वे क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल, बस स्टॉप, सूचना यापासून अनेक वाहतुकीचे फलक आदींच्या प्रतिकृती येथे पाहायला मिळतात.
या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे प्रतिकात्मक पुतळेही उभारण्यात आले आहेत. या प्रतिकृतींची माहिती घेण्यापासून ते प्रत्यक्ष त्यांची अंमलबजावणी करण्यापर्यंत या पार्कमध्ये मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे प्राण्याची पुतळे देखील या ठिकाणी उभा करण्यात आले आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे सोबत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंडी, झुलता पूल आहे. तसेच विविध खेळणी आहेत. रोज शेकडो विद्यार्थ्यांची ट्राफिक पार्कला भेट देत आहेत.
पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमामुळं पोलिसांचं कौतुक होत आहे. तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर उत्साहही पाहिला मिळतोय. 'बाबा, हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवू नका, असा हट्ट सांगलीतली मुलं आपल्या पालकांकडे धरू लागले तर आश्चर्य वाटायला नको.