एफ.आर.पीच्या मागणीसाठी खा. राजू शेट्टींचे 1 जानेवारीपासून आंदोलन
पहिला मोर्चा कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर
संगमनेर : साखरेला मागणी नाही असे म्हणत साखर कारखान्यांद्वारे शेतकऱ्यांना मिळणारी एफ.आर.पी थकवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. साखर कारखान दारांनी एफ.आर.पीचे पैसे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही ते दिले न गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. बराच काळ या एफ.आर.पीची मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसतेय पण साखर कारखानदार याला दाद देताना दिसत नाहीत. आता एफ.आर.पी थकवलेल्या साखर कारखान्यांविरोधात खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.
कार्यालयावर मोर्चा
एफ.आर.पी थकवलेल्या या साखर कारखानदारांविरोधात त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. एक जानेवारीपासून या मुजोर साखर कारखानदारांविरोधात आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये पहिला मोर्चा कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचं खासदार राजू शेट्टींनी सांगितले आहे.
'आधी शेतकऱ्यांचे पैसे द्या'
ऊस दार नियंत्रण १९६६ नुसार साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची एफ आर पी देणं बंधनकारक असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. साखरेला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे देता येत नसले, तर आधी सरकारचा कर आणि व्याजाचे हप्ते थांबवून शेतकऱ्यांचे पैसे साखर कारखानदारानी देण्याची मागणी शेट्टींनी केली.