विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : परिस्थिती कितीही बिकट असली तरी तिच्यावर मात करण्याची जिद्द हवी... अशीच जिद्द औरंगाबादच्या तेजस बोरगेनं दाखवली... वसतिगृहात राहून दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवणाऱ्या तेजसची ही संघर्ष कहाणी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या वैजापूर गावातला तेजस बोरगे... घरची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची... वडील व्यसनाच्या आहारी गेलेले... ते आईला सतत मारझोड करायचे... त्यामुळं संपूर्ण घरच उद्धवस्त झालेलं... मुलांना नवऱ्यापासून दूर ठेवण्यासाठी या माऊलीनं माहेरी आसरा मिळवला. तिथली परिस्थितीही काही वेगळी नव्हती. ऊषा बोरगेंच्या आई-वडिलांनी तात्पुरता आधार दिला. तिथून सुरू झाली जगण्याची धडपड... 


तेजसचा संघर्ष व्हिडिओ स्वरुपात पाहण्यासाठी इथे क्लिक करा


मुलं हुशार होती. मात्र शिक्षणासाठी पैसे नव्हते. सामाजिक कल्याण विभागाच्या वसतिशाळेत मुलांना प्रवेश मिळाला. काही अंशी शिक्षणाचा प्रश्न सुटला. पोटच्या मुलाला आईनं शिकण्यासाठी दूर ठेवलं. उदरनिर्वाहासाठी ती लोकांच्या घरची धुणीभांडी करून लागली. दोन मुलं, शिवाय म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारीही ऊषा बोरगेंवर... आपल्या आईच्या कष्टांचं चीज करण्यासाठी तेजसनंही जीव तोडून अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवले.


भविष्यात सनदी अधिकारी व्हायची तेजसची इच्छा आहे. तर आपल्या मुलानं मोठं व्हावं आणि स्वतःचं घर घ्यावं, अशी असं तेजसच्या आईचं स्वप्न आहे.


तेजसनं वक्तृत्व आणि कविता वाचन स्पर्धेत अनेक बक्षिसं पटकावली आहेत. समाज कल्याणच्या वसतिशाळेतून तो राज्यात पहिला आलाय. आता त्याला आईच्या कष्टाचे पांग फेडायचे आहेत... सनदी अधिकारी होऊन समाजाचं देणं फेडायचंय... त्यासाठी गरज आहे ती मदतीच्या हातांची... तुम्ही देणार ना तेजसच्या या धडपडीला साथ?


संघर्षाला हवी साथ


प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा


झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३


संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९