संघर्षाला हवी साथ : `ती`ला पोलीस अधिकारी व्हायचंय!
घरच्या गरीबीची जाणीव शिवानीलाही आहे. तीदेखील घरकामात हातभार लावते
तुषार तपासे, झी २४ तास, सातारा : वडिलांच्या निधनानंतर काबाडकष्ट करून आईनं तिला वाढवलं, शिकवलं... घरच्या परिस्थितीवर मात करत, दहावीच्या परीक्षेत तिनं ९० टक्के गुण मिळवले... पाहूयात साताऱ्यातल्या शिवानी दडसची ही संघर्षकहाणी...
सातारा जिल्ह्यातील बेलवडे या छोट्याशा गावात राहणारी शिवानी दडस... छोट्याशा घरात राहणारी... आई शारदा दडस आणि चार बहिणींचं हे कुटुंब... २००९ मध्ये शिवानीच्या वडिलांचं छत्र हरपलं. नवऱ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर चारही मुलींची जबाबदारी शारदा यांच्यावर आली. त्यांनी सासर सोडून माहेरचं बेलवडे गाव गाठलं. कुणाच्याही मदतीशिवाय त्यांनी जिद्दीनं उभं राहायचं ठरवलं... शेतात मोलमजुरी करून ही माऊली आपल्या चौघा मुलींना वाढवतेय. तुटपुंज्या कमाईत मुलींचं शिक्षण करतेय. अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शिवानीनं दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. शिवानीचं कौतुक करताना या माऊलीला अश्रू आवरत नाहीत.
घरच्या गरीबीची जाणीव शिवानीलाही आहे. तीदेखील घरकामात हातभार लावते. रात्र रात्र जागून, कोणतीही शिकवणी न लावता तिनं हे यश मिळवलंय. भविष्यात भारतीय पोलीस सेवेत अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न आहे.
आई शारदा आणि लेक शिवानी या दोघी तर जिद्दीनं झटतायत... पण शिवानीच्या स्वप्नांना पंख हवेत ते समाजाच्या मदतीचे... बेलवडेसारख्या छोट्याशा गावातल्या या मुलीचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही करणार ना मदत...?
संघर्षाला हवी साथ
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा
झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३
संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९