शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : आईबरोबर रोज धुणी-भांडी करायला जायचं.... रोजचं हे काम सांभाळून अभ्यास करायचा... वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलेलं... इतक्या अवघड परिस्थितीत तिनं अभ्यास केला... आणि दहावीच्या परीक्षेत तिला तब्बल ९८.२० टक्के मिळालेत... लातूरच्या तेजस्विनी तरटेची ही गोष्ट अंगावर शहारे आणणारी आहे... तेजस्विनीसाठी पुढे या आणि तिच्या संघर्षाला नक्की साथ द्या....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूरमधल्या इंडिया नगर भागात आजोळी राहणारी ही तेजस्विनी तरटे... तेजस्विनी अवघ्या दीड वर्षाची असताना तिच्या वडिलांचं ब्लड कॅन्सरमुळे निधन झालं. त्यामुळे मोठी मुलगी वैशाली आणि धाकटी तेजस्विनी... या दोघींची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर पडली... तेजस्विनीच्या आईनं घरोघरी धुणंभांडीची कामं सुरू केली... गेली १६-१६ वर्षं त्या हे काम करत आहेत... कुठल्याही परिस्थितीत मुलींना शिकवायचंच, या निर्धारानं त्या दिवसरात्र कष्ट करतायत... विशेष म्हणजे तेजस्विनीही दहावीत असताना वर्षभर आईबरोबर धुणी भांडी करायला जात होती... आईचे कष्ट कमी करण्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे, याची जाणीव तेजस्विनीला होती... म्हणूनच तिनं दहावीत भरपूर अभ्यास केला... तिला दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.२० टक्के  मिळालेत...


तेजस्विनीच्या या यशानं आईलाही आनंदाश्रू आवरत नाहीत. तेजस्विनीच्या वडिलांचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता... गरिबीमुळे योग्य ते उपचारही त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे तेजस्विनीला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय आणि गरीब रुग्णांची सेवा करायची आहे. 


तेजस्विनीची अभ्यासातली आवड आणि तिच्या घरची परिस्थिती लक्षात घेता ज्ञानप्रकाश शाळेच्या नरहरे दाम्पत्यानं तिच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं. पण गरीबीमुळे तेजस्विनीचं शिक्षण थांबायला नको, असं त्यांनाही वाटतंय.  


दहावीत असताना घरोघरी धुणी-भांडी करायला तेजस्विनीनं मदत केली... दहावीचा निकाल लागला आणि तेजस्विनीला तब्बल ९८.२० टक्के मिळाले... त्याही दिवशी ती आई बरोबर दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करायला गेली... इतक्या हुशार आणि गुणवान विद्यार्थिनीचं शिक्षण केवळ गरिबीमुळे थांबायला नको... तेजस्विनीच्या पंखांना बळ देण्यासाठी पुढे यायलाच हवं... 


या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे या.... त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानंच चेक काढा... 


संपर्कासाठी :


झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, मधू इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३


संपर्क : 022 - 24827821


ई-मेल : response.zeemedia@gmail.com