संघर्षाला हवी साथ : अपंगत्व, गरीबीवर करणारा हुसेन
लहानपणापासून आलेलं अपंगत्व, त्यात घरची गरीब परिस्थिती... तरीही ठाण्यातील मुंब्रा भागात राहणाऱ्या मोहम्मद हुसैननं दहावीला ९० टक्के गुण मिळवलेत. महापालिकेच्या ऊर्दू शाळेत शिकणारा मोहम्मद काबाडकष्ट करून शिकला. मात्र यापुढं त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गरज आहे ती मदतीच्या हातांची...
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : लहानपणापासून आलेलं अपंगत्व, त्यात घरची गरीब परिस्थिती... तरीही ठाण्यातील मुंब्रा भागात राहणाऱ्या मोहम्मद हुसेननं दहावीला ९० टक्के गुण मिळवलेत. महापालिकेच्या ऊर्दू शाळेत शिकणारा मोहम्मद काबाडकष्ट करून शिकला. मात्र यापुढं त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गरज आहे ती मदतीच्या हातांची...
'मेहनत करनेवालों की कभी हार नही होती...' हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय ते मुंब्रा भागात राहणाऱ्या मोहम्मद जाबीर हुसेननं... लहानपणापासून तो गरीबीत वाढला. आई-वडील बिहारमध्ये शेतमजुरी करतात. शिकण्यासाठी म्हणून तो मुंब्र्याला भावाकडं राहायला आला. घरी डब्बे पोहचवून तो शिक्षण घ्यायचा. पाचवीत असताना रेल्वे अपघातात त्याचा डावा पाय कायमचा निकामी झाला, तर उजव्या पायाचा खालचा भाग कापण्यात आला. वयाच्या दहाव्या वर्षीच त्याच्या नशिबी अपंगत्व आलं. पण अजिबाबत न डगमगता मोहम्मदनं शिक्षण सुरूच ठेवलं.
घरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या क्रमांक-१३ या ऊर्दू शाळेत तो जायचा. घरची परिस्थिती गरीबीची... त्यामुळं शिक्षण घेता घेता भावाला आणि बहिणीला जरीच्या कामात मदत करायचा... त्यातून मिळालेल्या पैशात शिक्षणाचा खर्च भागवायचा, शिवाय गावाला आई-वडिलांना पैसेही पाठवायचा... कोणताही खासगी क्लास नाही. तरी दहावीला त्यानं ९० टक्के गुण मिळवलं. त्याच्या यशानं सगळेच चकीत झालेत.
मोहम्मदनं स्वतः यशाचं शिखर गाठलंच... पण आपल्या बहिणीलाही दहावी पास होण्यासाठी मदतीचा हात दिला. उजली परवीन हे त्याच्या बहिणीचं नाव... गेल्या वर्षी पैसे नसल्यानं ती दहावीची परीक्षा देऊ शकली नाही. यंदा मोहम्मदनं आपल्यासोबत तिलाही शिकवलं आणि ती देखील ५१ टक्के गुण मिळवून पास झाली.
मोहम्मदला आता आयआयटीत प्रवेश घ्यायचाय... पण पैशांचं काय, असा प्रश्न त्याला पडलाय. ख-या अर्थानं आयुष्यात आजवर संघर्ष करत आलेला हा गुणी, हुशार मुलगा.. त्याच्या मदतीसाठी समाजातून देणा-यांचे हात पुढं येतील, एवढं नक्की...
या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे या.... त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानंच चेक काढा...
संपर्कासाठी :
झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, मधू इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३
संपर्क : 022 - 24827821
ई-मेल : response.zeemedia@gmail.com