निलेश वाघ, झी मीडिया, सटाणा : लहानपणीच त्याच्या आई वडिलांचं निधन झालं... एकट्या आजीनं कसंबसं त्याला सांभाळलं... आजीकडून होईना म्हणून तो स्वतःच पाचवीपासून किराणा दुकानात काम करायला लागला... एवढं सगळं सोसूनही त्यानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२.२० टक्के मिळवलेत... ही गोष्ट आहे सटाण्याच्या सचिन देवरेची...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सटाण्यातल्या दत्तनगर भागात सचिनच्या आजीचं छोटंसं घर आहे. सचिन आणि त्याची वृद्ध आजी असे दोघेच या घरात राहतात.  सचिनचे वडील ट्रकचालक तर आई मोलमजुरी करत होती.... कुटुंबाचा गाडा कसाबसा चालत होता.... पण सचिन लहान असतानाच दुर्धर आजारानं त्याच्या आई वडिलांचं निधन झालं... सचिनच्या आजीनं मोलमजुरी करुन त्याला वाढवलं... छोट्याश्या घरात थोडीशी भांडीकुंडी आणि अगदीच गरजेचं साहित्य सोडलं तर घरात साधा टीव्हीसुद्धा नाही... आजीच्या मोलमजुरीत दोन वेळचं जेवणही परवडत नव्हतं...  पाचवीत असताना सचिननं  एका किराणा दुकानात काम करायला सुरुवात केली. सकाळी शाळा, संध्याकाळी किराणा दुकानात काम आणि रात्री उशिरा अभ्यास असा सचिनचा दिनक्रम होता... असा अभ्यास करत करतच सचिननं दहावीत तब्बल ९२.२० टक्के मिळवलेत. 


सचिनला एवढं घवघवीत यश मिळूनही त्याचा आनंदोत्सव साजरा करायलाही पैसे नव्हते. शेजारच्यांनीच पेढे वाटून सचिनच्या यशाचा आनंद साजरा केला. सचिनच्या यशाचं आजीला कौतुक आहे... सचिनला मोठा साहेब झालेला विमलबाई देवरेंना (आजी) बघायचंय. 


सचिनच्या यशामध्ये व्ही. पी. एन. विद्यालयातल्या शिक्षकांचाही वाटा आहे.  सचिनच्या घरची परिस्थिती पाहता, शिक्षकांनी सचिनचे विशेष क्लासेस मोफत घेतले.  


सचिननं अत्यंत खडतर परिस्थितीत यश मिळवलंय... दहावीचा अभ्यास करताना  काळजी घेण्यासाठी काय किंवा आता कौतुक करण्यासाठी काय, मायेचे आणि हक्काचे आई वडीलही नाहीत... तरी सचिननं अतिशय लहान वयात नोकरी करुन इतकं उत्तम यश मिळवलंय... त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाच हवी... त्याला पुढे शिकून सीए व्हायचंय... त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्याला साथ द्यायलाच हवी.... 


]