संघर्षाला हवी साथ : बोलक्या मुलीची ही कहाणी!
शिक्षणाचा आणि तिच्या कुटुंबीयांचा जराही संबंध नाही... धुळ्याच्या योगिता पाटीलनं ज्या परिस्थितीतून यश मिळवलंय, त्याची कल्पना करणंही कठीण... तरीही योगितानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१ टक्के मिळवले... जिद्दी योगिताची ही गोष्ट पाहा.... आणि तिला सढळ हस्ते मदत करायलाही नक्की पुढे या!
प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : शिक्षणाचा आणि तिच्या कुटुंबीयांचा जराही संबंध नाही... धुळ्याच्या योगिता पाटीलनं ज्या परिस्थितीतून यश मिळवलंय, त्याची कल्पना करणंही कठीण... तरीही योगितानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१ टक्के मिळवले... जिद्दी योगिताची ही गोष्ट पाहा.... आणि तिला सढळ हस्ते मदत करायलाही नक्की पुढे या!
योगिताच्या हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक वेदना दडल्यायत... पण, परिस्थितीशी दोन हात करुन लढायचं आणि जिंकायचं हे जणू तिच्या रक्तातच भिनलेलं... धुळ्यातल्या दोंडाईच्याजवळ मालपूर या छोट्याशा गावात योगिता राहते... घरी अठरा विश्वं दारिद्र्य, योगिताचे वडील वयोवृद्ध, आई मूकबधिर, मोठी बहीण आणि लहान भाऊसुद्धा मूकबधीर.... संपूर्ण कुटुंब शेतमजुरीसाठी जातं... अशा परिस्थितीतही योगितानं दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के मिळवलेत. तिची अभ्यासाठी वेळ होती मध्यरात्री दोन ते पहाटे पाच...
योगिताची मोठी बहीण अनुराधाही तिच्याबरोबर दहावीची परीक्षा देत होती. या मूकबधीर बहिणीलाही योगिता रोज घरी येऊन शिकवायची. अनुराधालाही दहावीत ८४ टक्के मिळाले...
योगिताचे वडील तिला 'बोलकी मुलगी' असं म्हणतात. आमची बोलकी मुलगीच सगळं काही बघते, असं ते अभिमानानं सांगतात.
योगिताच्या पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. तिला आयपीएस अधिकारी व्हायचंय. मूकबधीर भाऊ आणि बहिणीवरही उपचार करायचेत. योगितानं एवढ्या कमी वयाच बराच संघर्ष केलाय. तिच्या पुढच्या संघर्षाला तुमची साथ हवीच आहे.