रवींद्र कांबळे झी मीडिया, सांगली : अपपतात बसला आग लागून 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik Bus Fire) आज सकाळी घडली होती. तर सप्तश्रृंगी गडावरही एसटी महामंडळाच्या बसला आग लागली. सुदैवाने यात कोणचाही मृत्यू झाला नाही. आता सांगलीतही गाडीला आग लागल्याची अशीच एक घटना समोर आली आहे. अपघातात चारचाकी गाडीला आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील पलूस इथं ही घटना घडली असून मकबूल गौसलाजम पटेल असं मृत तरुणाचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटेच्या सुमारास पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणारी चार चाकी गाडीचा अपघात झाला. शहरातील जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाट्यानजीक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आधी अपघात झाला आणि नंतर गाडीने पेट घेतला. चालक मकबूलला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.


अपघातात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. पहाटेच्या सुमारास नागरिकांनी पेटलेली गाड़ी पाहून टोल फ्री नंबर वरती फोन करून पोलिसांना माहिती दिली. पलूस पोलिसांनी घटना स्थळाचा धाव घेऊन पंचनामा केला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मकबूल याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे.