`कपडे काढून गावभर फिर, तुझं कर्ज माफ करतो,` तरुणाने स्वीकारलं आव्हान, वाजत गाजत काढली मिरवणूक
Sangli Crime : सांगलीत भरदिवसा तरुण रस्त्याने अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सर्फराज मुसा, झी मीडिया, सांगली : एखाद्यासोबत पैज लावली तर एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार सांगली (Sangli News) जिल्ह्यात घडला आहे. पैजे खातर एक तरुण चक्क कपडे काढून फिरत असल्याचे समोर आले आहे. वाजत गाजत मिरवणूक काढून हा तरुण अर्धनग्न अवस्थेत भररस्त्यात फिरत होता. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी (Sangli Police) याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतलं होतं.
तीन लाखांचे घेतलेलं कर्ज माफ होण्यासाठी एका तरुणाने ही अजब पैज लावली होती. शहरातील महाकाली साखर कारखान्यापासून शहराच्या मुख्य चौकापर्यंत चड्डी आणि बनियानवर हा तरुण चालत आला. विशेष म्हणजे यावेळी तरुणाच्या मागे एक वाजंत्री देखील होता. भर दिवसा रस्त्यावरून निघालेली अजब मिरवणूक पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी सदर तरुणाला व पैज लावणाऱ्या साथीदारांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले आहे. मात्र शहरातून निघालेल्या अजब मिरवणुकीची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.