तब्बल ४२ तासानंतर मगरीनं ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह हाती
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मगरीने हल्ला करत सागरला पाण्यात ओढत नेलं होतं.
सांगली : सांगलीत ब्रह्मनाळमध्ये मगरीने ओढून नदीत नेलेल्या सागरचा मृतदेह सापडलाय. सागरच्या मृतदेहाचा तब्बल ४२ तास शोध सुरू होता. कृष्णा नदीत मगरीनं १४ वर्षांच्या सागर डंक या मुलावर हल्ला केला होता आणि त्याला नदीत ओढून नेलं होतं... यानंतर वनविभाग आणि ग्रामस्थांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली.
कर्नाटकातल्या हारुगिरीमध्ये राहणारा सागर डंक हा त्याचे मामा सुनील नरुटे यांच्याकडे सुट्टीत राहण्यासाठी आला होता. नववीत शिकणारा सागर मामांसोबत कृष्णा नदीकाठी गेला होता. इतर मुलांसोबत नदीकाठी घाटावर तो बसला होता. त्यावेळी मगरीनं सागरवर हल्ला करून त्याला पात्रात ओढून नेलं. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मगरीने हल्ला करत सागरला पाण्यात ओढत नेलं होतं. अखेर, आज खूप प्रयत्नानंतर ब्रम्हनाळ-तुंग हद्दीत सागरचा मृतदेह सापडला.
गेल्या काही वर्षांपासून कृष्णा काठच्या अनेक गावात मगरीनं हल्ले केलेत. वारंवार होणारे हल्ले बघता मगरींचा बंदोबस्त करावा, अशी सांगलीकरांची मागणी आहे.