सरफराज सनदी, झी मीडिया, सांगली : (Sangli News) सांगलीमधून खळबळजनक बातमी समोर आली असून, इथं जिल्हा बँकेच्या 219 शाखांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तब्बल 48 अधिकाऱ्यांकडून ही चौकशी केली जात असून, या चौकशीतून अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार पुढील चार दिवस ही चौकशी सुरू असणार असून, त्याअंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 219 शाखांची तपासणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील एका शाखेमध्ये दुष्काळी निधीत अपहार करण्याचा प्रकार घडला होता, यानंतर मध्यवर्ती बँकेकडून तीन कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं. ज्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर शाखांमध्ये अशा पद्धतीने गैरव्यवहार झाला आहे का? याची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे.


हेसुद्धा वाचा : Video : हैदराबादनं IPL च्या Final मध्ये धडक मारताच काव्या मारननं आनंदाच्या भरात मारलेली ती मिठी भारी चर्चेत... 


पुढील चार दिवस ही तपासणी चालणार असून तपासणीचा अहवाल आल्यानंतर घोटाळा झाला असल्यास संबंधितांवर त्यासंदर्भातील कारवाईची भूमिका घेण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 


दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेमध्ये शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या दुष्काळ मदत निधीतून 56.33 लाखांच्या मदत रकमेवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं होतं. सदर प्रकरणी निलंबित कर्मचाऱ्यानं 40 लाख रुपयांची रक्कम बँकेत जमा केली होती. ज्यानंतर आता अपहारातील संपूर्ण 100 टक्के रक्कम मिळवण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय संचालक मंडळाच्या निर्देशांनुसार एकिकडे बँकेच्या शाखांची तपासणी होत असतानाच दुसरीकडे मात्र एकाच शाखेत 5 वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचं धोरण संचालक मंडळानं निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे.