रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: उत्पन्नवाढीसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने करवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. दरसुधार समितीच्या मान्यतेने महासभेत करवाढी बाबत अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, अचानकपणे लागू होणाऱ्या भरमसाठ करवाढीला नागरिकांचा विरोध आहे. महापुरातून आता कुठे सांगली सावरत असतानाच मोठया प्रमाणातील या करवाढीमुळे लोक संतप्त झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या अंदाज पत्रकानुसार महापालिकेला वर्षाला १४० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र यावेळी महापूर आणि विविध कारणांमुळे केवळ ३४ कोटी रुपये म्हणजे पंचवीस टक्के कर वसुली झाली आहे. त्यातच शासनाने हात आखडता घेतला आहे. तुटपुंज्या उत्पन्नामुळे नागरिकांना विकास कामे देण्यात येणाऱ्या सुविधा यावरही परिणाम होत आहे.


त्यामुळे महापालिकेने करवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. आरोग्य विभागातील दाखले, परवाने, विकास शुल्क, बांधकाम परवाने, दुकान गाळे, केस कर्तनालय, किराणा माल दुकान, चिकन,मटण दुकान, चारचाकी वाहनांचे पार्किंग, मॉल, बाजार, जाहिरात होल्डिंग, रस्त्यावर मंडप, भूखंड भाडे यात कर वाढ केली आहे. तसेच उदयाने भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे. विवाह पूर्व फोटोग्राफी व्हिडीओ चित्रीकरणासाठी सुद्धा तासिका वर भाडे आकारले जाणार आहे. कर वाढीमुळे पंधरा कोटीचे उत्पन्न वाढणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.


मात्र, करवाढ ही अनेक पट्टीत वाढवली जात आहे. पूर्वी १०० रुपये असणारा कर पाचशे ते एक हजार आणि एक हजार असणारा दहा हजार या प्रमाणात करवाढ होणार आहे. एकीकडे नागरी सुविधा अपुऱ्या आहेत, दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात कर वाढ का? असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर करवाढ केली तर शेवटी त्याचा भुर्दंड नागरिकांच्यावरच होणार आहे. शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. नागरी सुविधा अपुऱ्या प्रमाणात आहेत. महापुरामुळे सांगलीकराना मोठा फटका बसला आहे. अशावेळी नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर कराची टांगती तलवार ठेवली जात आहे.



* मालमत्ता हस्तांतरण फॉर्म -


परवाने पूर्वीचे दर - २००
सुचवलेली दरवाढ - ५००/१०००


* हॉटेल,मिठाई दुकान, बेकरी उत्पादन -
परवाने पूर्वीचे दर - ५०
सुचवलेली दरवाढ - ५०००


* केशकर्तनालय, किराणा दुकान -
परवाने पूर्वीचे दर - ५०
सुचवलेली दरवाढ - १०००


* वाईन, दारू, बिअर दुकाने - परवाने
पूर्वीचे दर - १०००
सुचवलेली दरवाढ - १००००


* मेडीकल दुकान, औषध गोडाऊन -
परवाने पूर्वीचे दर - १००
सुचवलेली दरवाढ - ५०००


* चिकन, मटण दुकाने -
परवाने पूर्वीचे दर - २००
सुचवलेली दरवाढ - १०००


* मंगल कार्यालय, चित्रपटगृह, मॉल बाजार -
परवाने पूर्वीचे दर - ५००
सुचवलेली दरवाढ - १००००


* पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी सेंटर -
प्रस्तावित दरवाढ - ३०००


* ज्वेलर्स, जीम-
प्रस्तावित दरवाढ - ५०००


* देशी दारू, सिंधी दुकाने
प्रस्तावित दरवाढ - १००००


* अस्वच्छ भूखंड दंड -
परवाने पूर्वीचे दर - -
सुचवलेली दरवाढ - 5 (रुपये चौरस फूट)


* वाहनांसाठी पार्किंग शुल्क, चार चाकी प्रतितास 
प्रस्तावित दरवाढ - लहान १० आणि मोठी २०


* जाहिरात होर्डिंग कर
परवाने पूर्वीचे दर - २५
सुचवलेली दरवाढ - ५०



* सार्वजनिक रस्त्यावर मंडप, प्रतिचौरस फूट -
परवाने पूर्वीचे दर - १ ते २५
सुचवलेली दरवाढ - १० ते ५०