सर्फराज मुसा, झी मीडिया, सांगली : सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातल्या उमदी येथे आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा (food poisoning) झाल्याचा प्रकार समोर आला. सुमारे 170 हून अधिक मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्या सर्व मुलांना माडग्याळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांचे प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमदी इथल्या समता आश्रम शाळेमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रात्री देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जेवणानंतर मुलांना अचानकपणे एकाच वेळी उलटी, मळमळ आणि जुलाब सुरू झाले होते. त्यानंतर मुलांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना तातडीने माडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर यातील 10 मुलांना अधिकचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


विषबाधा झालेल्यांच्या मध्ये पाच ते पंधरा वर्षांपासून मुलांचा आणि मुलींचा समावेश आहे. या सर्व मुलांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नेमकी विषबाधा कशी झाली याचा तपास करण्यात येत आहे.


दरम्यान, सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर माडग्याळ, जत आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी 24 तासात विषबाधेचा अहवाल देण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाला दिल्या आहेत. रात्री जेवण आणि बासुंदी खाल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


आश्रम शाळा संस्थापकाच्या घरी झालेल्या डोहाळे कार्यक्रमानिमित्ताने बनवण्यात आलेल्या बासुंदी मधून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गावात डोहाळे कार्यक्रम निमित्ताने करण्यात आलेले शिल्लक जेवण आश्रम शाळेतील मुलांना देण्यात आले होते. गावातील इतर लोकांना देखील जेवणानंतर विषबाधा होऊन त्रास झाल्याचे समोर आले आहे.


उमदीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील  समता अनुदानित  आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास 200 च्या आसपास  मुले-मुली या आश्रमशाळेत आहे.  यातील  जवळपास 170 विद्यार्थ्यांना रविवारी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा  झाली आहे. विद्यार्थ्यांना त्रास सुरू होताच तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशाही सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत.