रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातल्या शेड्याळ इथं एका पारधी कुटुंबाच्या घरावर काही जणांनी हल्ला केला. घरावर दगडफेक करत घरातील सामानही जाळून टाकण्यात आलं. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर घरातील पुरुष मंडळींना बेदम मारहाण करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादाक म्हणजे हल्ला करणाऱ्यांमध्ये शेड्याळ गावचे माजी सरपंच अशोक पाटील यांचाच समावेश होता. याशिवाय गावातील चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंजी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली आणि अन्य पाच अशा दहा जणांवर गुन्हा करण्यात आला आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण?
सांगली जिल्ह्यातल्या शेड्याळ इथं रमेश चव्हाण यांचं कुटुंब रहातं. शुक्रवारी गावातील काही जणांनी चव्हाण कुटुंबाकडे दारुच्या बाटलीची मागणी केली. पण ती न दिल्याने चव्हाण कुटुंबाला बघून घेण्याची धमकी देत ते तिथून निघून गेले. त्यानंतर रात्री परत येऊन त्यांनी चव्हाण कुटुंबाच्या घारवर हल्ला केला. कुटुंबातील बादल, सागर आणि आकाश या तीन भावांना बेदम मारहाण करण्यात आली. 


घरावरही तुफान दगडफेक करण्यात आली. घरातील फ्रीज, टीव्हीसह अन्य साहित्य बाहेर काढून पेटवून देण्यात आलं. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.