रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : आपल्या समाजात आजही मुलगी (Daughter) 'नकुशी' असते. मुलगी नको वंशाला दिवा हवा हा नारा आजही आपल्या समाजात दिसतो. काही ठिकाणी तो थेट असतो, तर काही ठिकाणी छुपा. पूर्वापारपासून आजही अशा काही घटना समोर आल्या आहेत. आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद (Boy-Girl Difference) कायम आहे. पण मुलगी नको अशी मानसिकता ठेवणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना सांगलीत समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्णयाचं सर्वत्र कौतुक 
सांगलीत एका कुटुंबाने चक्क आपला मुलगा दत्तक (Adoption) दिला आणि मुलगी दत्तक घेतली. या अनोख्या घटनेचं सर्वत्र कौतुक होतंय. सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातल्या शेगावमधली ही अनोखी घटना आहे. मोठया भावाने, आपल्या लहान भावाच्या मुलीला दत्तक घेत, त्याला आपला लहान मुलगा दत्तक दिला. इतकंच नाही तर मुलीचा नामकरण सोहळा अगदी दिमाखात गावात साजरा केला.


मुलगी झाली म्हणून मुलीला रस्त्यावर फेकण्याचं आणि आईच्या गर्भातच मुलीला मारण्याचे प्रकार रोजरासपणे घडतात .मुलगाच हवा ही धारणा आज देखील समाजात एखाद्या रूढी परंपरेप्रमाणे कायम आहे. पण मुलगी हे लक्ष्मी मानून अनेक जण मुलीचा स्वीकार करतात. सांगलीतल्या शेगावमध्ये बिरुदेव सुखदेव माने आणि त्यांचा लहानं भाऊ आप्पासो सुखदेव माने हे आपल्या आई वडीलांसमवेत एकत्र कुटुंबात राहतात.


परस्पर संमतीने दत्तक प्रक्रिया
बिरुदेव माने यांना एक मुलगा आहे तर सुखदेव माने याला एक मुलगी आहे. दोन्ही भावांना काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा दोन मुलं झाली ज्यामध्ये मोठा भाऊ बिरूदेव माने याला पुन्हा मुलगा तर लहान भाऊ अप्पासो माने याला पुन्हा दुसरी मुलगी झाली. आप्पासो माने यांना मुलगा हवा होता, तर बिरुदेव माने यांना मुलगी हवी होती.


दोघा भावांनी मग आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरच्यांशी विचार विनिमय करून आपल्या मुलांना एकमेकांना मुलं दत्तक देण्याचा निर्णय घेतला, मोठ्या भावाला लहान भावाने आपली मुलगी द्यायची आणि  मोठ्या भावाने लहान भावाला मुलगा दत्तक द्यायचं ठरलं आणि यासाठी मग या दोघा भावंडांनी नामकरण सोहळा देखील आयोजित केला.


 सगळ्या गावाला निमंत्रणही धाडलं आणि लहान भावाने आपली  2 महिन्याची मुलगी अन्विता हिला मोठ्या भावाला दत्तक दिली तर त्याचा 2 वर्षाचा मुलगा आरुष दत्तक घेतला. दत्तक पुत्र आणि दत्तकपुत्रीच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया देखील दोघा भावांनी पूर्ण केली आहे. शेगावच्या माने कुटुंबियांचा या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.