रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : मन सुन्न करणारी एक घटना सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरात घडली आहे. मिरजमधल्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून चार वर्षांच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाला, या घटनेने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकांनी डोळ्यात तेल घालून आपल्या लहान मुलांना सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना
सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरातील बुधगावकर मळा परिसरात निर्मिती टॉवर नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर डॉक्टर दिनेश देशमाने हे आपल्या कुटुंबासह राहातात. मंगळवारी रात्री यष्वी ही त्यांची चार वर्षांची मुलगी गॅलरीत खेळत होती. खेळता खेळता गॅलरीतून तोल जाऊन खाली कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत यष्वीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 


या घटनेची नोंद महात्मा गांधी पोलीस ठाण्यात करण्यात आली. याप्रकरणी महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,  दरम्यान, उंच इमारतीत राहणाऱ्या पालकांनी आपल्या लहान मुलांवर घराच्या गॅलरीत किंवा इमारतीच्या गच्चीवर खेळताना लक्ष द्यावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


घशात काजू अडकल्याने चिमुरड्याचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली होती. दोन वर्षांच्या एका मुलाने काजू गिळला आणि तो काजू त्याच्या घशात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बिहारमधल्या (Bihar) चंपारण इथली आहे. इथे राहणारे राजेश कुमार यांच्या दोन वर्षांचा मुलगा कार्तिक कुमार हा घरात खेळत होता. एका टेबलवर वाटीत काजू ठेवले होते.


 खेळता-खेळता कार्तिक कुमारने त्या वाटीतील काजूंपैकी एक काजू गिळला. पण यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. कार्तिकचा आरडा-ओरडा ऐकून त्याचे आईवडिल तात्काळ धावत आले. मुलांची स्थिती पाहून त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. मुलाला डॉक्टरांनी ऑक्सीजन लावला. तब्बल वीस मिनिटं मुलाला वाचवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. पण दुर्देवाने मुलाचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलाचा डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने राजेश कुमार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.