Sangli News : बसला धडक दिल्यानंतर एअर बॅग उघडली पण... कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Sangli Accident : या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. भरधाव कारने खासगी ट्रॅव्हल्सला समोरून इतक्या जोरदार धडक दिली की गाडीचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : सांगलीच्या (Sangli) विटा येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासजी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा- महाबळेश्वर महामार्गावर (Vita Mahabaleshwar highway) घडला आहे. या भीषण अपघातात तीन पुरुष व एक महिला ठार झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मृत सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. तर जखमींना उपरासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विटा येथील सातारा रोडवर शिवाजीनगर येथे हा भीषण अपघात घडला आहे. अपघातात मृत पावलेले सर्व जण तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथील असून मृतांमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. सकाळी सातच्या दरम्यान, हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
सकाळी विट्याकडून खासगी ट्रॅव्हल्स विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताराच्या दिशेने चालली होती. त्याचवेळी सातारा येथून येणारी फोर्ड फिएस्टा ही कार विट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्याचदरम्यान विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर उताराच्या ठिकाणी समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा अक्षरक्षः चुराडा झाला होता.
गव्हाण येथील काशीद कुटुंब हे फोर्ड फिएस्टा कारमधून साताऱ्यावरुन विट्याकडे येत होतं. तर विट्याहून महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताऱ्याकडे खाजगी ट्रॅव्हल्स निघाली होती. उतराच्या ठिकाणी फोर्ड गाडीची खासगी ट्रॅव्हल्सला समोरून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती,ज्यामध्ये चार चाकी गाडीचा अक्षरशः चक्काचुर झाला. या कारमध्ये असलेले काशीद कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले आहेत. तर गाडीतली एअर बॅग उघडल्याने एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.
या अपघातात काशीद कुटुंबीयातील चंद्रकांत काशीद, पत्नी सुनीता काशीद, मेहुणा अशोक आणि चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदानंद काशीद हे एअर बॅग उघडल्यामुळे बचावले आहेत. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी सातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेनंतर विटा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
अख्खं वऱ्हाडच अपघातात ठार
दुसरीकडे, लग्नासाठी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. छत्तीसगडमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील 10 जण दगावल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडच्या कांकेर नॅशनल हायवेवर काल भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण लग्नासाठी जात होते.