लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेसला सांगलीत जोरदार धक्का बसणार?
काँग्रेसचे विश्वजीत कदम, सत्यजीत देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा
सांगली : सांगली जिल्ह्यातले काँग्रेसमधले दोन नेते भाजपाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजीत देशमुख भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. पक्षप्रवेशाबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे. येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय होईल अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आणि जनाधार असलेले नेते असूनही, काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे या दोन्ही नेत्यांच्या कारकिर्दीला फटका बसत असल्यानं, हे दोघेही काँग्रेस सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याचं सांगण्यात येतंय.
विश्वजीत कदम हे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत तर सत्यजीत हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. आमदार विश्वजित कदम यांना भाजपात येण्याची याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खुली ऑफर दिली होती.
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ, सक्षम नेतृत्व, जनाधार असलेले नेते असूनही काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे आपल्या कारकिर्दीला फटका बसत असल्याने हे दोन्ही नेते काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचं म्हटलं जातंय. काँग्रेसमधील गटातटामुळे जिल्ह्यातील, सत्ताकेंद्र हातातून जात असल्याने जनतेचे प्रश्न सोडवतानाही अडचणी येत आहेत.
चर्चेवर कदम-देशमुखांचं स्पष्टीकरण
काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी मात्र सध्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेत तथ्य नाही, असं सांगितलं आहे. मी काँग्रेसमध्येच आहे, असंही त्यांनी म्हटलंय. मात्र, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी भाजपा नेत्यांकडून आपणास संपर्क होत असल्याचं सांगितलंय. 'असं असलं तरी अद्याप मी कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचलेलो नाही.... मी सध्या काँग्रेसमध्येच आहे' असं देशमुख यांनी म्हटलंय.