मुंबई: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले वनमंत्री संजय राठोड यांचा उद्याचा पोहरागडावरचा दौरा रद्द झाला आहे. त्यात आजच्या कॅबिनेट बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. त्यामुळं राठोड नेमके कुठं लपून बसलेत, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूला १० दिवस उलटून गेलेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केलेत. मात्र राठोड नेमके कुठं आहेत, याचा अतापता कुणालाही नाही. दोन दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदार-खासदार-मंत्र्यांची बैठक झाली. त्या बैठकीला राठोड उपस्थित नव्हते. आज मंत्रालयात झालेल्या कॅबिनेट बैठकीलाही त्यांनी दांडी मारली.


वनमंत्री राठोड १८ जुलैला पोहरागडावर येऊन मौन सोडतील, असं दोन दिवसांपूर्वी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता राठोड यांचा हा दौरा देखील तूर्तास रद्द झाला आहे.


दरम्यान, पूजा चव्हाणसोबत पुण्यातल्या घरात राहणारा अरुण राठोड देखील फरार झाला आहे. त्याच्या तपासासाठी पुणे पोलीस जंग जंग पछाडत आहेत. यवतमाळ आणि परळीत गेलेल्या पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.


तर दुसरीकडं पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अनेक संशयितांची नावं समोर आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यासाठी कोर्टात जाण्याचा इशारा काही वकिलांनी दिला.


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढतच चाललं आहे. पूजाच्या कुटुंबियांनी दिलेली माहिती, मित्र अरुण राठोडचं गायब होणं आणि वनमंत्री संजय राठोडांचं लपून राहणं या सगळ्याच बाबी संशय वाढवणाऱ्या आहेत.


तर दुसरीकडे उपमुख्य़मंत्री अजित चव्हाण यांनी संजय राठोड लपून बसले नाहीत, ते माझ्या संपर्कात आहेत असा दावा केला आहे. अजित चव्हाण संजय राठोडांबाबत आणखीन काय खुलासा करणार का? संजय राठोड कधी मौन सोडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.