Maharashtra Politics : नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अनेक मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे नाव घेत  संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याबाबत हा मोठा गौप्यस्फोट केला. संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


नवाब मलिकांना महायुतीत घेण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिकांना महायुतीत घेण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असतानाच, संजय राऊतांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजित पवारांनीच विरोध केला होता, असा दावा राऊतांनी केलाय. त्यामुळं शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या वेळी नेमकं काय घडलं, याचा तपशीलच राऊतांनी जाहीर केलाय.


शिंदेंना अजितदादांचा विरोध


मविआ स्थापनेसाठी ताज लँडस एन्ड हॉटेलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत अजितदादांनी शिंदेंना मुख्यमंत्री करायला विरोध केला. जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटलांचाही शिंदेंना विरोध होता. शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही, असं अजित पवारांनी लिफ्टमधून खाली उतरताना सांगितल्याची माहिती राऊतांनी दिली.


आता तेच अजित पवार शिंदेंच्या हाताखाली काम करत असल्याचा टोला राऊतांनी लगावला. तर, कोण संजय राऊत, असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. राऊतांच्या या दाव्यानंतर नागपुरातलं राजकीय वातावरणही तापलंय. तर, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास सगळ्यांची मान्यता होती, असंही राऊतांनी सांगितलं. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरेंकडे विचारणा केली असता, त्यांनी अधिक बोलणं टाळलं. 2019 साली सत्तास्थापनेवेळी काय घडलं, त्यावरून राजकारण सुरूच आहे. 2024 साली निवडणुका होणार असल्यानं हे राजकीय दावे-प्रतिदावे आणखी वाढण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं बोललं जातंय. शिंदे-फडणवीसांवर अजितदादा नाराज असल्याचीही चर्चा आहे. राऊतांच्या नव्या गौप्यस्फोटामुळं आगीत आणखी तेल ओतलं जाणार आहे.


नवाब मलिकांना जो न्याय तो प्रफुल्ल पटेलांना का नाही? उद्धव ठाकरे यांचा सवाल


नवाब मलिकांना जो न्याय तो प्रफुल्ल पटेलांना का नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. युतीत असताना पंतप्रधान मोदींनी मुंबईतल्या सभेत पटेलांच्या मिरचीसोबतच्या व्य़वहाराबाबत उल्लेख केला होता. त्याबाबत आता भूमिका का स्पष्ट केली नाही असा सवालही त्यांनी केला. तर मलिकांसारखे आरोप असल्यास तो न्याय लागू होणार असा दावा फडणवीसांनी केलाय.