संजय राऊत (Sanjay Raut) खिचडी घोटाळ्याचे (Khichdi Scam) मुख्य सूत्रधार असून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा सगळा घोटाळा झाला आहे. लोकांचा जीव जात असताना उद्धव ठाकरे गटाचे लोक गरिबांच्या हक्काच्या खिचडीत घोटाळा करत होते. ईडीने चौकशी वाढवावी आणि संजय राऊतांना अटक करावी असं ते म्हणाले आहे. दरम्यान संजय राऊत यांनी यावर एका वाक्यात व्यक्त होत प्रतिक्रिया देणं टाळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट


 


संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद ठरेल असं जाहीर केलं आहे. जागावाटप अंतिम झालं असून, उद्याच्या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह घटकपक्ष आणि आपचे नेते हजर असतील असं सांगितलं आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, "त्यांच्या म्हणण्याला अर्थ असतो, ते बकवास लोक आहेत, त्यांना सोडून द्या".


महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद


संजय राऊत यांनी शिवालयमध्ये मंगळवारी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार असल्याची माहिती दिली. जागावाटप, पुढील रणनीती यासंदर्भात सर्व माहिती जनतेसमोर ठेवू. जागावाटप अंतिम झाल्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, घटकपक्षाचे सगळे नेते, आपचे नेते सगळेच उद्या संवाद साधतील असं त्यांनी सांगितलं आहे. 


 "महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. सर्व बातम्या अतिरंजित आहेत. एखाद्या जागेवरुन कार्यकर्ते आग्रही आणि उत्साही असतात. आमच्यातही असे कार्यकर्ते आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतही आहेत. प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढणं हा उपाय आहे. रामटेक, कोल्हापूर, अमरावतीसाठी आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता आणि आजही आहे. पण आम्ही जाहीर विधानं केली नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही आगामी काळात संयमाने भूमिका घेण्याचं ठरवलं आहे," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 


सांगलीच्या जागेबद्दल विचारलं असता आमच्यात कोणताही वाद नाही असं ते म्हणाले. "विशाल पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाची आपण निवडणूक लढण्याची भावना असते. आम्ही त्या भावनेचा आदर करतो. राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करु," असं संजय राऊतांनी सांगितलं.