नाशिक : Sanjay raut on BJP :दिल्लीतल्या डोमकावळ्यांनी कितीही आरोप केले तरी पाठीचा कणा ताठ आहे, असं व्यक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut ) यांनी केले. राज्य तुळीशीचे रोप आहे, भांग लावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा राऊत यांनी भाजपला (BJP) दिला. भाजप आणि  शिवसेना वेगळे झाले तरी सातत्याने ते एकमेकांवर टीका करत आहेत. आज नाशिकच्या दौऱ्यावर असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  भाजपवर अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातत्याने भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. भाजपाकडून वारंवार सरकार पडण्याच्या दाव्याला शिवसेनेकडून वेळोवेळी प्रत्युत्तर दिले गेले आहे. दिल्लीत जिथे मी राहातो, तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत. काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही, असा जोरदार टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.


राऊत यांनी इशार देताना म्हटले, तुम्ही माझ्यावर कितीही आरोप करा, माझ्या पाठिचा कणा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार आहे. महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचे पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटते की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी भाजपवर चढवला.


 ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे किती छापे घातले तरी आम्ही ठाम आहोत. सरकारी यंत्रणाचा वापर करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी  सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालेय, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गांधी कुटुंबाचंही तेच म्हणणे आहे, हे सरकार पाच वर्ष टिकेल. तसेच भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केले, तर  25 वर्ष हे सरकार हलणार नाही, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला.