Sanjay Raut on Shiv Sena Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणासंदर्भात सुनावणी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने निकाल दिला असून या निकालावर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना हा सत्याचा नाही खोक्यांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. कणकवलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांना पत्रकारांनी या निकालाबद्दल प्रश्न विचारला असता, "हे अपेक्षित होतं," असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. "ज्या पद्धतीने सरकार बनवलं. ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप वापर झाला. त्या खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला हे आज स्पष्ट झालं. हा खोक्यांचा विजय आहे सत्याचा नाही," असं संजय राऊत म्हणाले. तसेच "प्रभू रामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळत असेल तर मला असं वाटतं सत्यमेव जयते हे ब्रिदवाक्य तोडून असत्यमेव जयते असं करावं लागेल," असा टोलाही राऊत यांनी लगावला.


"खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे, हे आज स्पष्ट झालं. जो पक्ष बाळासाहेबांनी, लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात. त्याचं चिन्ह विकत घेतात याची नोंद इतिहासात राहतात. आज या देशातील जनतेनं निवडणूक आयोगावरील विश्वास गमावला आहे," असंही राऊत म्हणाले.


दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्यातील मंत्री उदय सामंत यांनी या निकालाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. "आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद झाला आहे. सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो आमच्याकडे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. आम्हाला जे काही कागदपत्रं होते, पुरावे होते ते निवडणूक आयोगाकडे दिले होते," असं सामंत म्हणाले.


"समाधान या गोष्टीचा आहे की माननीय बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन करताना जी निशाणी घेतली होती ती आज आम्हाला मिळाली याचं समाधान आहे. पुराव्यांबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात हेच सांगतोय की न्याय देवता आहे. आम्ही कधीच मागणी केली नव्हती की पाच बेंचकडून सात बेंचकडे जावं. ज्यांना विश्वास नसतो ते असे आरोप प्रत्यारोप करत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इतर सहकारी असतील कोणीही आम्हाला हे मान्य नाही ते मान्य नाही असं म्हटलं नव्हतं. आम्ही सच्चाईने निवडणूक आयोगासमोर म्हणणं मांडलं होतं त्याचं फलित आम्हाला मिळालं," असं सामंत म्हणाले.