मुंबई : आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार असून शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्यांवर एकत्र येण्याचे काम सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले. भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये असे कालपर्यंत अनेक पक्ष म्हणत होते. आता त्यांच्यासाठी वेळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस-एनसीपीने योग्य निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनाचे निमंत्रण दिले. आम्ही ते स्वीकारले आहे. आम्हाला यासाठी अवधी लागेल. राज्यपालांनी भाजपाला ७२ तासांची मुदत दिली होती तर शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली आहे. अशा वेळी जास्त वेळ मिळण्याची गरज होती. पण या राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकल्याचेच यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही महाराष्ट्राला यात ढकलणार नाही असेही ते म्हणाले. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत, सद्गृहस्थ आहेत त्यामुळे आमच्या अनेक भुमिका त्यांच्यासमोर मांडू असेही राऊत म्हणाले. 



भाजपाने अपयशाचं खापर शिवसेनेवर खापरं फोडू नये असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.  भाजपा विरोधी पक्षामध्ये बसण्यास तयार झाला पण ५०-५० च्या फॉर्मुलावर बसून विचार करायला तयार नाही. शिवसेनेसोबत निवडणुकीआधी ज्या चर्चा झाल्या त्यावर बोलायला भाजपा तयार नाही. आणि राज्यपालांना सांगितले जाते की शिवसेना आमच्या सोबत येत नाही. ठरल्यानुसार झालं असतं तर असं झालं नसतं असेही ते म्हणाले. 


अरविंद सावंत हे केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा देत आहेत. आता युतीचे नाते हे केवळ औपचारिकता राहीले आहे. याचा अर्थ काढायचा तो काढा असे ते म्हणाले.