पुणे : 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावर बंदी आली असली तरी यामधून निर्माण झालेले वाद संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. पुस्तकाच्या मुद्द्यावर छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी प्रतिक्रिया द्यावी असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राऊतांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी राऊतांचा बिनपट्ट्याचा अशी खिल्ली उडवली होती. तसेच शिवसेना, शिववडा हे नाव ठेवताना शिवरायांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का ? असा प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केला होता. आता या सर्वावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका खासगी वृ्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांना या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत असा टोला राऊतांनी लगावला आहे. 


शिवसेना भवनावर छत्रपती शिवरायांच्य पुतळ्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो दाखवत यावरुन देखील उदयनराजे यांनी निशाणा साधला होता. त्यावर बोलताना ही उदयनराजे यांची खंत असल्याचे राऊत म्हणाले.


'चाक नव्हे स्टेपनी नेली'


अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन भाजपने तुमची सत्तास्थापनेचा प्रयत्न करणारी तीन चाकी गाडी पंक्चर करण्याचा प्रयत्न केला का ? गाडीचे चाक पळवून घेऊन गेले का ? असा प्रश्न संजय राऊत यांना ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी विचारला. त्यावेळी हजरजबाबी असलेल्या संजय राऊत यांनी भाजपने आमच्या गाडीचे चाक नेले नाही तर स्टेपनी पळवून नेली होती असे मिश्किल उत्तर दिले.


असे परतले धनंजय मुंडे 


यावेळी राऊत यांनी भाजपच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नावेळचा धनंजय मुंडे यांचा किस्सा सांगितला. धनंजय मुंडे देखील अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापनेसाठी गेले होते. तर ते कसे परतले याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाला नसतानाही संजय राऊत यांनी धनंजय मुंडे हे परतत असल्याचे जाहीर केले होते. आणि प्रत्यक्षात धनंजय मुंडे परतले होते. याबद्दल सांगताना राऊत म्हणतात, शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात होते. त्यामुळे ते परतणार असल्याचा विश्वास मला होता. त्यामुळे मुंडे देखील येत असल्याचे विश्वासाने म्हटल्याचे राऊत म्हणाले.