Sanjay Raut : `राजभवनात घुसून राज्यपालांची बिस्किटं न खाता...`; संजय राऊतांनी भाजपला सुनावलं
Sanjay Raut : राज्यपालांवर कारवाई करावी लागेल. अरे ला कारे ची भाषा जे म्हणताहेत, त्यांनी आधी राज्यपालांवर कारवाई करावी, असेही संजय राऊत म्हणाले
Bhagat Singh Koshyari Controversy : राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप (BJP) नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानाने राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपनेही राज्यपालांच्या विधानाचे समर्थन केलेले नाही. मात्र भाजप खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने भाजपची गळतेपी झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विरोधकांकडून या मुद्द्यावरुन भाजपवर सातत्याने टीका केली जात आहे. दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) भाजपला सुनावलं आहे.
तुमच्या मनगटात तेवढी हिंमत नाही - संजय राऊत
"राज्यपालांवर कारवाई करावी लागेल. अरे ला कारे ची भाषा जे म्हणताहेत, त्यांनी आधी राज्यपालांवर कारवाई करावी. मुंबई भाजपचे अध्यक्ष सांगत होते की, कर्नाटकच्या अरे ला कारे करू. हा त्यांचा नेभळटपणा आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्किटं न खाता, त्यांना विचारा की का रे शिवरायांचा अपमान करता? हे आधी तिथे विचारा. मग बाकीचं बघा. पण, तुमच्या मनगटात तेवढी हिंमत नाही," असे संजय राऊत म्हणाले.
छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातच झालाय हे तरी मान्य आहे का?
"रोज उठताहेत आणि शिवरायांची बदनामी करताहेत. रोज उठताहेत छत्रपतींचा इतिहास तुडवताहेत. अख्ख्या जगाला माहितीये की, छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला. महाराष्ट्रातील लहान लेकरं सांगतील की, शिवनेरीवर महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. काल भाजपने शोध लावला की शिवनेरी नाही. शिवनेरी इतिहासातून काढून टाकलं या लोकांनी. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातच झालाय हे तरी मान्य आहे का आपल्याला? छत्रपती जन्माला आले होते, हे तरी आपण स्वीकारताय का?", असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.
बोम्मईंना शिव्या घालाव्यात - संजय राऊत
दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. मात्र नियोजित बेळगाव दौरा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून रोखण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले होते. त्यानंतर आता हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला असे म्हटले आहे.
"कबड्डी नावाचा खेळ महाराष्ट्रात आहे. त्याला एक टच लाईन असते. या दोन मंत्र्यांनी किमान सीमारेषेला टच तरी करून यावं. बाकी इथे काय कबड्डी खेळायची ती खेळा, पण तिकडे सीमेवर जा तरी. यांच्यात हिंमत नाही. हे हतबल, लाचार लोक आहेत. हे काहीही करू शकत नाही. हे फक्त बोलतात. आम्हाला शिव्या घालतात. त्यांनी बोम्मईंना शिव्या घालाव्यात. बोंबलावं त्यांच्या नावाने. शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात. घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला सुरक्षा आहे. त्यांनी जायला पाहिजे. घुसायला पाहिजे", असेही संजय राऊत म्हणाले.