`सर्वात आधी राज्यपालांना...`; अर्वाच भाषेत शिवीगाळ करणाऱ्या संजय गायकवडांना राऊतांनी सुनावले
Sanjay Raut : शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केल्यानंतर संजय गायकवडांनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती
Sanjay Raut : शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मला कोणी गद्दार शिव्या देत असेत तर तो मी माझा सन्मान समजतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर 'मेरा बाप चोर है' असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, असं राऊत म्हणाले होते.
शिव्या देणाऱ्यांवर फुले उधळू - संजय राऊत
"मला कोणी गद्दार शिव्या देत असेत तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सर्वात आधी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल, भाजप प्रवक्ते आणि नेत्यांना द्याव्यात. आम्ही शिव्या देणाऱ्यांवर फुले उधळू. तुम्ही त्यांना शिव्या दिल्यात तर महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आमचा निर्णय जनतेला मान्य आहे - संजय गायकवाड
"आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘मा****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू," असं वक्तव्य संजय गायकवाड (Sanjay Gaikwad abuses Sanjay Raut) यांनी केले आहे.