कोणत्याही पक्षात जा, तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार! संजय राऊत यांचा राणेंना टोला
`मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता पॉवर` असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे
अहमदनगर : 'आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, शिवसैनिक हीच त्याची ओळख राहते' असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसैनिक म्हणून एक वेगळी ओळख आहे, तो नारायण राणे, तो आमुक - तमुक असं बोलत नाही, हा शिवसेनेचा आहे असं म्हणूनच ओळखतात असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर जवळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर सोनई इथं शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. 'सत्ता ही आपली मानसिक आधार आहे काही झालं तरी सत्ता आपल्या मागे आहे असं कार्यकर्त्यांना सांगत तुम्हाला त्रास दिला तर आम्ही बोलू शकतो, 'ऐकतो की नाही का पाठवू तुला गडचिरोलीला' असं बोलण्याचा अधिकारी सत्तेने दिला आहे, त्यामुळे हा अधिकार आपण गाजवायला पाहिजे, वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार असं संजय राऊत म्हणाले.
कोकणातील पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरूनदेखील खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला आणि 10 हजार रुपये तातडीची मदत दिली. 'तुम्ही मोदींना सांगा हेलिकॉप्टर मधून पाहणी करून 1 हजार कोटोची मदत द्यायला' असं राऊत यांनी म्हटलं.
मी पुन्हा येईन... मी पुन्हा-पुन्हा येईन.... जोपर्यंत नगर जिल्हयात शिवसेनेचा झेंडा तोपर्यंत पुन्हा येईन शक्य नाही, असा टोला लगावतानाच दिल्लीच्या तक्तावरही भगवा फडकवू, हारलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत तीच खरी बाळासाहेबांना मानवंदना ठरेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.