बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचा कडक इशारा, राजकीय तिरडी उठणारच !
Sanjay Raut warns Shiv Sena rebel MLAs : शिवसेनेकडे पुरावे मागण्याचं काम फुटलेले लोक करत आहेत. हे पाप आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई : Sanjay Raut warns Shiv Sena rebel MLAs : शिवसेनेकडे पुरावे मागण्याचं काम फुटलेले लोक करत आहेत. हे पाप आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना मराठी माणसाच्या मनात आहे हा पुरावा आहे, असं राऊत म्हणाले. बाणाच्या टोकाप्रमाणे टोकदार अशी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार असल्याचे राऊत म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले, लोक त्यांची (बंडखोर शिंदे गट) गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांची राजकीय तिरडी उठणारच !
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राज्यात सत्याचा खून केला जातोय. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा पुरावा देईल आणि जनता त्यांची गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही. ही एक अस्वस्थ करणारी घटना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी मराठी माणसासाठी हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना स्थापन केली. त्या संघटनेला खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. या महाराष्ट्राची 11 कोटी जनता हाच पुरावा आहे. दहावीस लोक पैसे देऊन फोडले हा पुरावा होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
बंडखोरी करणाऱ्यांना दिल्लीतून मान्यता मिळते. दिल्लीश्वरांचे हत्यार म्हणून हे वापरले जात आहेत. वरुन बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा पाहतोय तो तुम्हाला माफ करणार नाही. तिरडीही उठते. महाराष्ट्राच्या जनतेचा जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तो पैसे आणि खोके देऊन मिळत नाही. उठावा मधला 'उठ' हा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
दरम्यान, यावेळी शिंदेच्या संभाव्य अयोध्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. आयोध्यात जा वाराणसीला जा काशीला जा कुठेही जा पण शिवसेनेच्या हिंदुत्वाची मशाल ही कायम तेजाने तळपत राहील, असे सांगत आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. विनायक राऊत यांनी तीन वेळा ओम बिर्ला यांना पत्र दिले. त्यांना उत्तर दिलं नाही पण शिवसेनेचा फुटेल गट जातो त्यांना लगेच उत्तर मिळते, असे राऊत म्हणाले.