संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान
आळंदीत आज माऊलींचा पालखी सोहळा; सोहळ्याला कोरोनाचं ग्रहण
कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सलग दुस-या वर्षी प्रस्थान सोहळा मर्यादित म्हणजेच 100 वारक-यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रस्थानानंतर दर्शनासाठी 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आलीय. (Santshrestha Dnyaneshwar Maharaja Palkhichan departs today) मात्र त्यातील जवळपास 20 जणांना कोरोनाची लागण झालीय. कोरोनाचं हे संकट असताना उत्साह कायम आहे.
आळंदीत आज माऊलींचा पालखी सोहळा आहे. मात्र या सोहळ्याला कोरोनाचं ग्रहण लागलंय. माऊली पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या १०० वारक-यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झालीय. तर दर्शनासाठी परवानगी दिलेल्या १६४ पैकी २० वारक-यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. यंदा कोरोनामुळे आळंदीत संचारबंदी आहे. त्यामुळे इंद्रायणीच्या घाटावर सामसूम आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारीसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे. विठूरायाच्या भेटीसाठी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ वारक-यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
दुसरीकडे पैठणमधून संत एकनाथांची पालखी मार्गस्थ झाली आहे. मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पालखीचं प्रस्थान झालं आज मुक्काम समाधी मंदिरात आषाढीसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. वाखारी ते इसबावी 40 वारकऱ्यांसमवेत 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे.
आषाढी वारीच्या अनुषंगाने 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त पंढरपुरात लावण्यात येणार आहे. नियम घालून मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम घालून 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे.वाखरी ते इसबावी दरम्यान मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली असून प्रत्येक पालखी सोबत 40 वारकऱ्यांना पालख्यांसमवेत सहभागी होता येणार आहे.मात्र इसबावी येथून प्रत्येक पालखीतील 2 व्यक्तींना पुढे पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.